Monsoon rains have started again in Maharashtra, bringing relief to farmers
मुंबई : अठरा दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे. 1 ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एक टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.
अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अति मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आता पुढील २४ तास राज्यासाठी चिंतेचे असल्याचे सांगितले जात आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. तरी काही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. पुढील २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.