अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नगर जिल्ह्यात दाखल झाली असून या शिवस्वराज्य यात्रेला नगर जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या सभांना नागरिक चांगलीच गर्दी करत आहेत या यात्रेसाठी जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित होते. यावेळी शहरातून मोठी रॅली काढत ही यात्रा सभास्थळी आली. सभा पार पडल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रोहित पवारांबाबत जो प्रकार घडला तो चुकीचा – खासदार लंके
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एस आर पी एफ प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनादरम्यान रोहित पवार व पोलीस प्रशासनातील वादावर प्रतिक्रिया देताना खासदार निलेश लंके म्हणाले की, ज्यांच्या प्रयत्नातून जी वास्तू उभी राहिली, उभी राहणार आहे त्या वास्तूच्या उद्घाटनासाठी येत असतील आणि त्यांना जर रोखणार असतील तर हा सत्तेचा गैरवापर आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेली कामाच्या उद्घाटनाला सरकार बदलले म्हणून विरोध करणे चुकीचे आहे. आम्ही एक काम केले तर तुम्ही चार काम करून त्याची उद्घाटन करा. रोहित पवारांबाबत जो प्रकार घडला तो चुकीचाच.
काल अकोल्यापासून शिवस्वराज्य यात्रेला नगर जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्हा शहरात चांगला प्रतिसाद या यात्रेला मिळाला आहे. तब्बल पाच ते सहा तास उशीर होऊन देखील शेवगाव, श्रीगोंद्यामध्ये मोठी सभा पार पडली. यावेळी शेवगाव, पाथर्डी आणि श्रीगोंद्यातील जनतेने देखील यात्रेला उदंड प्रतिसाद दिला. आज नगर शहरात मोठी रॅली संपन्न झाली यानंतर सभेला देखील शहरातील जनतेने मोठा सहभाग नोंदवला.
प्रशासन हे शंभर टक्के सत्तेतील पदाधिकाऱ्यांचे ऐकून विरोधातील लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आजही माझे अनेक कामे शासन दरबारी प्रलंबित आहेत. कामाबाबत अधिकाऱ्यांना संपर्क केला असता संपर्क केला म्हणून देखील विरोधात निकाल दिला जातो. सत्ता आज ना उद्या बदलत असते अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना केली.
दरम्यान पारनेर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये चांगली चुरस निर्माण झाले असून पारनेर ची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी मोठे प्रयत्न केले जात असून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील दावा ठोकला असून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार लंके यांच्या पत्नी इच्छुक असल्याचे बोलले जाते. याबाबत खासदार निलेश लंके यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रस्सीखेच असा काही विषय नाह, खालच्या पातळीवरील कोण बोलतं असेल तर त्याकडे लक्ष न देता वरिष्ठ पातळीवर शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले हे काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे असते. प्रत्येकाला असे वाटते की माझ्या पक्षाला आणि मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे. सहाजिक ही भावना प्रत्येकाची असते आणि ती व्यक्त केली पाहिजे तर त्यांची चूक नाही.