आषाढी वारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये खासदार सुनेत्रा पवार यांचा सहभाग
देहू : राज्यामध्ये आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. आज पुण्यातील देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. यामध्ये लाखो वारकऱ्यांनी हरि नामाचा गजर करत सहभाग घेतला. देहू परिसरामध्ये मंदिरामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. भजन व अभंगांसह मंदिरामध्ये वारकरी दाखल झाले आहे. संपूर्ण देहूनगरीमध्ये विलक्षण उत्साह असून संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. यावेळी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील सहभाग घेतला आहे.
अजित पवार गटाच्या नेत्या व खासदार सुनेत्रा पवार यांनी देहूमध्ये दाखल झाल्या. आषाढी वारीच्या उत्साहामध्ये सहभागी होत त्यांनी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच टाळ व मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामामध्ये देखील सुनेत्रा पवार सहभागी झाल्या. त्यांनी मंदिर परिसरामध्ये वारकरी महिलांसोबत फेर धरला. खासदार सुनेत्रा पवार यांनी अगदी साधेपणाने फुगड्या खेळल्या आणि वारीमध्ये सहभाग घेतला.
फोटो – नवराष्ट्र टीम
देहू मंदिर परिसरामध्ये अनेक दिंड्या आल्या असून दर्शनाला देखील मोठी गर्दी झाली आहे. देहूनगरीमध्ये लाखो भाविक जमले असून वारकऱ्यांमध्ये वारीचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. इंद्रायणीच्या काठी वारकऱ्यांनी स्नान करत आपल्या आषाढी वारीला सुरुवात केली आहे. आज दुपारी 2 वाजता पालखीने मंदिरातून प्रस्थान केले. हरि नामाचा जयघोष व तुकोबारायांचा गजर यामुळे देहूमधील संत तुकाराम महाराज मंदिर परिसर दूमदुमून गेला आहे.