
मनोज जरांगेंच्या अडचणींत होणार वाढ; 'या' कारणामुळे मुंबई पोलिसांनी बजावले समन्स
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वेळोवेळी उपोषण, आंदोलन करण्यात आले आहेत. त्यांच्या या पाठपुराव्यानंतर सरकारकडून अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. असे असताना आता मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांच्यासह इतर पाच जणांना समन्स बजावले आहे.
मनोज जरांगे यांना पोलिसांनी समन्स बजावत 10 नोव्हेंबर रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत सांगण्यात आले आहे. समन्स बजावलेल्या या सर्वांना सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे. बजावलेल्यांमध्ये समन्समध्ये जरांगे यांच्याशिवाय पांडुरंग तारक, गंगाधर कलकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आल्याचा या सर्वांवर आरोप आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी २ सप्टेंबर रोजी, मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईतील सार्वजनिक जीवन विस्कळीत केल्याबद्दल फटकारले होते. न्यायालयाने म्हटले होते की, त्यांनी प्रथमदर्शनी आझाद मैदानावर शांततापूर्ण निषेधासाठी दिलेल्या पोलिस परवानगीच्या प्रत्येक अटींचे उल्लंघन केले आहे.
याशिवाय, पाच दिवसांच्या निषेधादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्ते आणि आयोजकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मराठा कार्यकर्त्यांनी राज्य सरकार त्यांच्या मागण्या पूर्णपणे मान्य करत नाही तोपर्यंत ते किंवा त्यांचे समर्थक मुंबई सोडणार नाहीत, जरी त्यासाठी त्यांचे प्राण गमवावे लागले तरी चालेल, अशी भूमिका घेतल्याने आझाद मैदानात तणाव वाढला होता.
काय म्हटले आहे समन्समध्ये?
भारतीय न्याय संहिता, २०२३ व्या कलम ३५(३) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, न्यायालयाने निर्देश दिले की, आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १००/२०१९ नोंदवला गेला, भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १८९(२), १८९(३), १९०, २२३(अ) १२६(२), २७१, २७२ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा, २०२३ व्या कलम ३७ (३). ३८, १३५, १३६ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, त्यासाशी संबंधित तथ्ये आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी तुमची चौकशी करणे आवश्यक आणि योग्य असल्याचे आढळले आहे.
हेदेखील वाचा : Munde Vs Jarange Patil: “जरांगे हे तुम्हाला महागात…”; धनंजय मुंडेंचे ‘त्या’ आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर