खामेनेई यांच्यात भारतीय रक्त, अमेरिकेला...; इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अबू आझमींचं वक्तव्य
इराण आणि इस्रायलमध्ये वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचं कौतुक केलं असून, त्यांच्यात “भारतीय रक्त” असल्याचंही म्हटलं आहे. तसेच अमेरिका आणि इस्त्रायलच्या भूमिकेवर त्यांनी कठोर टीका केली आहे.
अबू आजमी म्हणाले, “इराणने इस्त्रायलला जो प्रत्युत्तर दिला आहे, ते खरंच जोरदार होतं. अमेरिकेच्या या जागतिक हरकतींना आता आळा बसायला हवा. अमेरिका जे काही करत आहे, ते फक्त इस्त्रायलच्या बाजूने असून, फिलिस्तीनमध्ये मरणाऱ्या मुलांबाबत त्यांना काही देणंघेणं नाही.”
आजमी यांनी अली खामेनेई यांच्या पार्श्वभूमीचा उल्लेख करताना म्हटलं, “ते ८५ वर्षांचे आहेत. त्यांचे आजोबा भारतात, उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे जन्मले होते. त्यामुळे त्यांच्यात भारतीय रक्त आहे. त्यांनी जो पराक्रम केला त्याला मी सलाम करतो. युद्धाची सुरुवात इस्रायलने केली आणि नंतर इराणने त्याला जशास तसं उत्तर दिलं.”
अमेरिकेच्या हस्तक्षेपावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “आपल्या देशातून अमेरिकेचा हस्तक्षेप आता संपायला हवा. अमेरिका स्वतःला जगाचा ठेकेदार समजतो. तो नेहमी इतर राष्ट्रांना धमक्या देत राहतो. राम मनोहर लोहिया यांचं स्वप्न होतं की भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांनी एक महासंघ निर्माण करावा. अमेरिका नेहमीच आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आला आहे, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना आजमी म्हणाले, “अमेरिका असं म्हणतो की भारत-पाकिस्तान युद्ध आम्ही थांबवलं, हाच आपल्या देशाचा अपमान आहे. पंतप्रधान म्हणतात, असं काही झालं नाही, पण अमेरिका सतत हेच सांगत आहे की त्यांनी हस्तक्षेप केला.”इराण-इस्रायल संघर्षामुळे संपूर्ण जगात तेलसंकटाचं सावट आहे. अशा वेळी अबू आझमी यांचं हे वक्तव्य नव्या चर्चेला वाव देणारं ठरत आहे. त्यांच्या या विधानावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.