
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,
सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत.
हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत.
ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.
माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे,
– जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा.
– औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका.
– त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
– एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे.
लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे.
जय महाराष्ट्र!
आपला,
अमित राजसाहेब ठाकरे
Gold Rate Today: टॅरिफ लागू झाल्यानंतर आज सोन्यात सर्वात मोठा बदल, आकडेवारीत 1640 रुपयांची तफावत
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी माध्यमांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. मराठा आंदोलकांमुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली होती, त्याचा मुंबईकरांना त्रास होतोय, असा प्रश्न उपस्थित केला असता राज ठाकरे म्हणाले, मुंबईकरांना त्रास होतोय वगैरे गोष्टींवर फक्त एकनाथ शिंदेच बोलू शकतात. मागच्या वेळी एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना? त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला होता. मग मराठा आंदोलक मुंबईत परत का आले. असा प्रतिप्रश्न करत राज ठाकरेंनी या सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात.” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कोर्टात चेंडू टाकला. पण राज ठाकरे यांच्या या उत्तरावरून मनोज जराहे यांनी मात्र त्यांच्यावर सडकून टीका केली होती.
राज ठाकरे यांनी केलेल्या प्रतिक्रियेनंतर मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे म्हणाले की, “राज्यातील समाज म्हणतो की ते दोघे भाऊ (उद्धव-राज) चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे. पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतो. आम्ही तुला कधी विचारलं का, तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते नंतर पळून गेले? त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कधी आलास? आम्ही तुला विचारलं का, तू काल पुण्यात का आलास? तुझी सासरवाडी नाशिकला आहे म्हणून तू 50 वेळा नाशिकला गेलास, याची चौकशी आम्ही केली का?”
ते पुढे म्हणाले, “एकदा लोकसभेला फडणवीसने तुझा गेम केला, विधानसभेला तुझं पोरगं पाडलं, तरीही तू त्याचीच री ओढतोस. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलेलं पोरगं आहे. फडणवीस त्याच्या घरी चहा पिऊन गेला आणि सगळा पक्ष बरबाद झाला, तरी त्याला चालतं. आमच्या खेड्यात याला ‘कुचक्या कानाचं’ म्हणतात,” अशा शब्दांत जरांगे पाटलांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.