
Mumbai Pune Expressway : पनवेलच्या वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा! अटल सेतू-पुणे एक्स्प्रेसवे जोडमार्गाचे 67 टक्के काम पूर्ण
मुंबई, नवी मुंबई आणि पुणे यांच्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अटल सेतू-मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai Pune Expressway) जोडमार्गाचे 67 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) 7.35 किलोमीटर लांबीचा सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येत आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते पुणे प्रवासासाठी सध्याच्या तुलनेत सुमारे 60 ते 90 मिनिटांची बचत होण्याची अपेक्षा आहे.
अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे. मात्र, पुणे, गोवा आणि जवाहरलाल नेहरू बंदराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे पनवेल मुख्य जंक्शन परिसरात वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होतो. अटल सेतूवरून येणारी वाहने आणि प्रमुख महामार्गांवरील वाहतूक एकत्र आल्याने या भागात कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या कमी करण्यासाठी एमएमआरडीएकडून चिर्ले आणि पळस्पे मार्गे स्वतंत्र सहापदरी उन्नत मार्ग विकसित केला जात आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सध्याचे रस्ते आणि पुलांच्या पायाभूत सुविधांच्या वर तिसऱ्या स्तरावर उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करून वाहतुकीचा प्रवाह विनाअडथळा ठेवण्याचा यामागील उद्देश आहे. चिर्ले विभागात पायाभरणी आणि खांब उभारणीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तर पळस्पे विभागातही महत्त्वाच्या संरचनात्मक कामांना वेग आला आहे.
हा जोडमार्ग सुरू झाल्यानंतर अटल सेतूवरून येणाऱ्या वाहनांना पनवेलमधील गर्दीच्या प्रमुख चौकांमधून न जाता थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे पनवेल जंक्शनवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचे व्यवस्थापनही अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
Mumbai News: मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी! BMC चा मोठा निर्णय, नेमकं काय आहे कारण?
या कॉरिडॉरमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जाणारी रस्ते कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. तसेच आसपासच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांना फायदा होईल. मुंबई, नवी मुंबई, पुणे, गोवा आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील प्रवास आणि मालवाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग 48 आणि राष्ट्रीय महामार्ग 348 वरील वाहतुकीचे योग्य वितरण करण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहने आणि मालवाहू वाहनांचा प्रवास अधिक कार्यक्षम होऊ शकतो.
एमएमआरडीएच्या ‘मुंबई इन 59 मिनिट्स’ या व्यापक संकल्पनेशी हा प्रकल्प जोडलेला आहे. मेट्रो मार्गिका, द्रुतगती महामार्ग, बोगदे, रिंग रोड आणि महत्त्वाचे जोडमार्ग एकमेकांशी जोडून एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी शहरे, उद्योग, बंदरे आणि नव्याने विकसित होणाऱ्या केंद्रांना प्रभावीपणे जोडणे आवश्यक आहे. अटल सेतूने मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान कनेक्टिव्हिटीमध्ये मोठा बदल घडवला असून, नव्या जोडमार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांमधील संपर्क अधिक वेगवान होईल.
उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनीही या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत 60 ते 90 मिनिटांची बचत होण्याची अपेक्षा व्यक्त केली. पनवेल परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रकल्पाच्या 67 टक्के भौतिक प्रगतीला महत्त्वाचा टप्पा म्हटले आहे. अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे यांच्यातील महत्त्वाची जोडणी पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक वाहतुकीचे वितरण अधिक प्रभावी होईल आणि विद्यमान जंक्शनवरील ताण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Ans: एमएमआरडीएच्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे 67 टक्के काम पूर्ण झाले आहे.
Ans: हा सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर 7.35 किलोमीटर लांबीचा आहे.
Ans: दक्षिण मुंबई ते पुणे प्रवासात वाहतुकीच्या परिस्थितीनुसार सुमारे 60 ते 90 मिनिटांची बचत होण्याची अपेक्षा आहे.