मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (AAP) दारूण पराभव झाला. पण हा पराभव महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (NCP) मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. पण दिल्ली निवडणुकीच्या निकालाने भारतीय जनता पक्षाला (BJP) केवळ राजधानीतच नव्हे तर महाराष्ट्रातही मोठा जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात AAPची कधीही मोठी राजकीय ताकद नव्हती, पण शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ला केजरीवाल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. भाजपविरोधी आघाडीत केजरीवाल हे शिवसेना (UBT) आणि NCP (SP) सोबत कायम उभे राहिले. पण या पराभवानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे.
अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचा संबंध 2011-12 मध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेशी जोडला जातो. या मोहिमेचे नेतृत्व पुणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथील समाजसुधारक अण्णा हजारे यांनी केले होते. दिल्लीत रामलीला मैदानात झालेल्या आंदोलनात लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अरविंद केजरीवाल, शांती भूषण, प्रशांत भूषण, किरण बेदी, मेधा पाटकर, स्वामी अग्निवेश, कर्नल देविंदर सहरावत आणि हर्ष मंदर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एप्रिल 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी उपोषण केले होते.
2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मात्र अण्णा हजारे यांनी AAP विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका करत, “नेत्याने निःस्वार्थ आणि प्रामाणिक असले पाहिजे. जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा हवा असेल, तर हे गुण असणे गरजेचे आहे,” असे विधान केले.
भाजपविरोधातील राजकीय लढाईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हातमिळवणी केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. जेव्हा भाजपने ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली, तेव्हा केंद्र आणि महाराष्ट्रात AAP नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.
केंद्र सरकारने गट ‘A’ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीसाठी प्राधिकरण निर्माण करणारे विधेयक आणल्यानंतर केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याकडून पाठिंबा मागितला. त्यांनी सर्व भाजपविरोधी पक्षांनी या कायद्याला विरोध करावा, असे आवाहन केले.
दिल्लीत भाजपचा विजय होताच प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘सर्व
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शिवसेना (UBT) आणि NCP (SP) यांनी त्यांना पाठिंबा दर्शवत दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांनी शिवाजी पार्क आणि BKC येथे INDIA आघाडीच्या सभांमध्ये हजेरी लावली होती. मात्र, दिल्लीतील पराभवामुळे शिवसेना (UBT) आणि NCP (SP) चिंतेत आल्या आहेत. भविष्यात भाजपविरोधी संघर्षात केजरीवाल यांना अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.