File Photo : Virendra Sachdva
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. अशातच दिल्लीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी एक मोठे विधान केले आहे. दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होताच पहिल्या मंत्रिमंडळातच एसआयटी स्थापन केली जाईल आणि आप सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असे वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर पुन्हा एकदा कठोर कारवाई केली जाईल.
हेदेखील वाचा : PM Narendra Modi: भाजपनं करून दाखवलं; 27 वर्षांनी दिल्लीत ‘कमळ’ फुलवलं; PM मोदी साजरा करणार विजयोत्सव
चौकशीदरम्यान अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगातही जावे लागू शकते, असे म्हटले जात जात आहे. दरम्यान, नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा निवडणूक पराभव होताच उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने दिल्ली सचिवालयात पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी कागदपत्रे आणि डेटा संरक्षित करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, दिल्लीतील आपच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. यातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप मद्य धोरणाबाबत आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून, अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयने माजी मंत्री सत्येंद्र जैन, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली. तसेच, या प्रकरणात त्यांना तुरुंगवास सुद्धा झाला. आता भाजप सत्तेत येताच या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची पुन्हा एकदा चौकशी केली जाईल, असे म्हटले जात आहे.
भाजपने निवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. भाजपने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. 70 जागांचे निकाल समोर आले आहेत. भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा सुपडासाफ झाला आहे. दरम्यान, भाजपच्या या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात गेले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधितही केले.
तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचे सरकार होणार स्थापन
तब्बल 27 वर्षांनी दिल्ली विधानसभेत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी झालेले प्रवेश वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, भाजप ऐनवेळी नवीन वेगळी खेळी खेळून दुसऱ्या चेहऱ्याला संधी देणार का हे पहावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय साजरा करण्यासाठी भाजप मुख्यालयात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Delhi Assembly Elections 2025 : “दिल्ली की जीत हमारी, अब बंगाल की बारी”; भाजप नेत्याचे थेट ममता बॅनर्जींना आव्हान