
२२ वर्षांची श्रद्धा अन् परंपरा! ‘चेंबूरचा सम्राट’ गणेशोत्सवात नवगुंजराचे अद्भुत रूप ठरतेय आकर्षण
यंदाच्या उत्सवात ‘नवगुंजरा’ या वैशिष्ट्यपूर्ण पौराणिक संकल्पनेला विशेष स्थान देण्यात आले आहे. नवगुंजरा हे प्रामुख्याने ओडिशाच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेशी जोडलेले एक अद्भुत संमिश्र रूप आहे. वेगवेगळ्या प्राणी-पक्ष्यांच्या शरीराच्या अवयवांनी बनलेले हे रूप विष्णू-कृष्णाच्या दैवी स्वरूपाशी जोडले जाते.
या संकल्पनेतून ‘रूप अनेक, तत्त्व एक’ असा संदेश अधोरेखित करण्यात आला आहे. वेगवेगळे बाह्यरूप असले तरी त्यामागील दैवी तत्त्व एकच असल्याची भावना या कथेतून व्यक्त होते.
Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
नवगुंजराची प्रसिद्ध कथा ओडिया कवी सरला दास यांच्या ओडिया महाभारतात आढळते. अर्जुन तपश्चर्या करत असताना त्याच्यासमोर त्याने यापूर्वी कधीही न पाहिलेले विचित्र प्राणीरूप प्रकट झाल्याची कथा आहे.
हे रूप पाहून अर्जुन सुरुवातीला सावध होतो आणि धनुष्य उचलतो. मात्र, या विलक्षण रूपामागे सामान्य जीव नसून दैवी शक्ती असल्याची जाणीव झाल्यानंतर तो शस्त्र खाली ठेवतो आणि त्या रूपापुढे नतमस्तक होतो. महत्त्वाचे म्हणजे, नवगुंजराची ही कथा व्यासांच्या मूळ संस्कृत महाभारतात आढळत नाही. ती सरला दासांच्या ओडिया महाभारताशी संबंधित आहे.
‘नवगुंजरा’ या नावाप्रमाणेच या स्वरूपात विविध जीवांचे अवयव एकत्र आलेले दिसतात. वेगवेगळ्या चित्रणांमध्ये तपशीलात काही फरक दिसू शकतो. प्रचलित ओडिया प्रतिमाशैलीत कोंबड्याचे मस्तक, मोराची मान, बैलाचे कुबड, सिंहाची कंबर, सर्पाची शेपटी आणि हत्ती-वाघ-हरिण किंवा घोड्यासारख्या प्राण्यांचे पाय अशा विविध वैशिष्ट्यांचा समावेश दिसतो. एका मानवी हातात कमळ धारण केलेलेही दाखवले जाते. त्यामुळे नवगुंजरा हे केवळ एका विलक्षण प्राण्याचे चित्रण न राहता विविधतेतून प्रकट होणाऱ्या एका दैवी तत्त्वाचे प्रतीक मानले जाते.
नवगुंजराला ओडिशाच्या धार्मिक आणि कलात्मक परंपरेत विशेष स्थान आहे. विशेषतः श्रीजगन्नाथ परंपरा आणि ओडिशाच्या प्रसिद्ध पट्टचित्र कलेत नवगुंजराचे चित्रण पाहायला मिळते. रंगीबेरंगी आणि सूक्ष्म कलाकुसरीतून हे दैवी रूप साकारण्याची दीर्घ परंपरा आहे.
शिव शक्ती गणेशोत्सव मंडळाच्या २२ वर्षांच्या प्रवासामुळे चेंबूर परिसरात या उत्सवाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. बाप्पाचे दर्शन, आकर्षक सजावट आणि धार्मिक-सांस्कृतिक संकल्पनेच्या माध्यमातून भाविकांना यंदा वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘२२ वर्षांची श्रद्धा, २२ वर्षांची परंपरा आणि २२ वर्षांचा चेंबूरचा सम्राट’ या भावनेतून मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. ‘नवगुंजरा’च्या माध्यमातून अनेकतेत एकता, प्रत्येक रूपातील दैवी अस्तित्व आणि भारतीय पौराणिक-कला परंपरेची ओळख भाविकांसमोर मांडली जात आहे.
Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ