आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा; महाराष्ट्र बंदचा इशारा (Photo - X)
दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे देशव्यापी आंदोलन पार पडत आहे. काल (10 ऑकटोबर) दिल्ली पोलिसांनी CJP च्या पदाधिकाऱ्यांची तसेच आंदोलनकर्त्यांची धरपकड केल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतदेखील आंदोलनकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. यावरूनच आता राजकीय वातावरण खवळले आहे. (CJP Protest Mumbai)
दादर येथील शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. अनेकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर शिवसेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आदित्य ठाकरे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आणि मुंबई बंद करण्याचा इशारा दिला.
CJP च्या आंदोलनासाठी शिवाजी पार्क परिसरात कार्यकर्ते जमू लागल्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. आंदोलनस्थळाकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आणि अनेकांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.
यानंतर शिवसेना भवन परिसरात कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आदित्य ठाकरेंनी रोखल आहे. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी करत त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.
पोलिसांच्या कारवाईवरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली. आंदोलन शांततेत सुरू असताना जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. “आता महाराष्ट्र बंद होणार,” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांच्या कारवाईमुळे मुंबई बंद करण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, “आता आम्ही शांत बसणार नाही,” असे म्हणत त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
पोलिसांनी शिवसेना भवनात प्रवेश केल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, अमित ठाकरेंनाही अटक करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबईतील पोलिसांची कारवाई आणि त्यानंतर शिवसेना भवन परिसरात निर्माण झालेल्या तणावामुळे या आंदोलनाला राजकीय वळण मिळाले आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या सहभागामुळे आंदोलनाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.






