Eknath Shinde Delhi Tour:
Eknath Shinde Delhi Tour: मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंभी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांवर सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. वादग्रस्त वक्तव्यामुळे शिंदेसेना चांगलीच अडचणीत आली आहे. त्यातच गेल्या काही काळापासून महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे यांचा प्रभावही घटत चालल्यामुळे ते नाराज आहेत. अशातच मंगळवारी (5 ऑगस्ट) मंत्रिमंडळाची बैठक सोडून एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले. अलीकडच्या दिवसात हा त्यांचा दिल्लीचा दुसरा दौरा आहे. महायुती सरकारमध्ये शिंदेंच्या निर्णयांवर सातत्यने लगाम लावला जात असल्यामुळे ते नाराज आहेत.
अशातच एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय, उपराष्ट्रपती निवडीपूर्वी ते खासदारांसोबत त्यांची रणनीतीही ठरवतील. त्यांचा दिल्ली दौरा राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो.
मुख्यमंत्री कार्यालय सरकारच्या सर्व कामांवर विशेष लक्ष ठेवून आहे. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाच्या फाईलला हिरवा कंदील देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या रकमेची फाईलही मुख्यमंत्र्यांकडे पाठवावी लागेल. आता मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच आमदारांना निधी वितरित करता येईल. निधी वाटपात शिंदे केवळ त्यांच्या पक्षाच्या आमदारांना प्राधान्य देत असल्याचा आरोप होता.
म्हणूनच हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता ५०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या शहरी विकास प्रकल्पांसाठीही मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक आहे. या सर्व निर्बंधांमुळे शिंदे महायुती सरकारमध्ये असहाय्य वाटत आहेत. त्यामुळेच ते दिल्लीत जाऊन त्यांच्या नेत्यांशी सल्लामसलत करत आहेत. ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबद्दल माहिती देत आहेत. परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुती सरकारवर पकड खूप मजबूत आहे. अशा परिस्थितीत शिंदेंना दिल्लीत प्रवेश मिळणे कठीण आहे.
अलिकडच्या काळात शिंदे गटातील अनेक मंत्रीही वादात अडकले आहेत. या मंत्र्यांमध्ये कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश आहे. नोटांनी भरलेली बॅग घेऊन शिरसाट वादात अडकले आहेत. त्याच वेळी, त्यांची विधाने देखील अडचणीचे कारण बनत आहेत. दुसरीकडे, कदमवर त्याच्या आईच्या नावाने मिळालेल्या परवान्याच्या आधारे डान्स बार चालवल्याचा आरोप होता.