मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- ट्विटर)
कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, केंद्रीय कौशल्य विभागामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्फत महाराष्ट्रात देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रातून ३८७८ स्पर्धकांनी आतापर्यंत अर्ज केला आहे स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना कौशल्य विकास विभागामार्फत मार्गदर्शन केले जात आहे.
कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेच्या माध्यमातून कृषी, आरोग्य, महिला सुरक्षा,नागरी विकास, पर्यावरण, संरक्षण, कृत्रिम बुध्दिमत्ता, शिक्षण आणि रोजगारक्षमता अशा विविध क्षेत्रातील समस्या समजून सर्जनशील उपाय देण्याची संधी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या स्पर्धेत नवोन्मेषक, विद्यार्थी, विद्यार्थी गट, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, एमएसएमई, कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक व संशोधन संस्था तसेच इतर इनोव्हेशन टीम्स यांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा नसून प्रत्येकाच्या सर्जनशीलतेला संधी मिळणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेषतः ग्रामीण भागातील मुलांचा यामध्ये सहभाग वाढवण्यासाठी आम्ही कार्यरत असल्याचेही कौशल्य मंत्री लोढा यांनी संगितले.
कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, या स्पर्धेमध्ये ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. https://sevainnovationchallenge.in/ या लिंकच्या माध्यमातून अथवा क्यूआर कोड स्कॅन करून इच्छुक स्पर्धेसाठी आपला प्रकल्प सादर करू शकतात. या पोर्टलवर पहिल्या स्तरावर प्राथमिक माहिती नोंदणीसाठी आवश्यक असेल तसेच दुसऱ्या स्तरावर प्रकल्प सादर करतांना आधार संलग्न वैयक्तिक माहिती व प्रकल्पाची माहिती उमेदवारांना सादर करावी लागणार आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून उमेदवारांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी चॅट बॉट सुविधा सुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?
सृजन ट्रस्ट, पुणे आणि विज्ञान भारती कोकण प्रांत या दोन्ही संस्थांसह कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाने सामंजस्य करार केला. या संस्थांच्या मदतीने स्पर्धेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असून, त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सृजन ट्रस्ट, पुणे आणि विज्ञान भारती कोकण प्रांत या दोन्ही संस्थां सहकार्य करणार आहे.
प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, तसेच स्पर्धेसाठी आवश्यक मार्गदर्शन सुद्धा विज्ञान भारती कोकण प्रांत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सृजन ट्रस्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा व्यापक प्रचार व प्रसार करून युवक-युवतींचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. सृजन ट्रस्टतर्फे दरवर्षी ‘डिपेक्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून नवकल्पना, स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील युवकांसाठी परिषद आयोजित केली जाते. या उपक्रमामुळे नवकल्पना, संशोधन, स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात कार्यरत युवकांना व्यासपीठ मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.






