मुंबईकरांसाठी गुड न्यूज! म्हाडाच्या १२ हजारांहून अधिक घरांची बंपर लॉटरी, कधी आणि कुठे?
मुंबईत हक्काचं घर असावं असं इथे राहणाऱ्या प्रत्येकाला वाटत असतं. पण कोट्यवधी रुपये खर्चून सर्वसामान्यांना घर घेणं परवडत नाही. मात्र म्हाडा सर्वसामान्यांचं हे स्वप्न पूर्ण करत आहे. दरम्यान मुंबईतील म्हाडाच्या विविध वसाहतींच्या पुनर्विकासातून १२,००० पेक्षा अधिक नव्या घरांची निर्मिती होणार असून या घरांची लॉटरी लवकरच काढली जाणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर (वरळी), अभ्युदयनगर, कामाठीपुरा, जीटीबीनगर आणि मोतीलालनगर या ठिकाणच्या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी बांधकाम आणि विकास संस्थेची नियुक्त करण्यात आली आहे.
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीच्या किंमतीही वधारल्या! जाणून घ्या सविस्तर
या उपक्रमांतर्गत येत्या ४–५ वर्षांत नागरिकांना अधिक प्रशस्त, आधुनिक आणि सुविधायुक्त घरे मिळणार आहेत. या पुनर्विकासामुळे म्हाडाच्या ताब्यात सुमारे १०,००० ते १२,००० नवीन घरे येतील, जे लॉटरीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होतील.
राज्य सरकारने म्हाडाच्या वसाहती आणि काही उपकरप्राप्त इमारतींच्या संयुक्त पुनर्विकासाला मंजुरी दिली आहे. विशेषतः कामाठीपुरा व जीटीबीनगरमधील सिंधी निर्वासित वसाहतींचा समावेश यामध्ये आहे. यासाठी विशिष्ट बांधकाम संस्था नेमण्यात आली आहे. अभ्युदयनगर आणि कामाठीपुरा या भागांसाठी नव्या संस्थांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
या ठिकाणी उभारणार नवीन घरे
वांद्रे रिक्लेमेशन व आदर्शनगर (वरळी): या दोन ठिकाणच्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासामुळे सुमारे १,००० ते १,५०० नव्या घरं उपलब्ध होणार आहेत.
अभ्युदयनगर (काळाचौकी): म्हाडाच्या विकास संस्थेद्वारे येथे सुमारे ५०० ते ६०० नवीन सदनिका बांधल्या जातील.
कामाठीपुरा: सुमारे ८,००० भाडेकरूंना प्रत्येकी ५०० चौरस फुटांची घरे आणि ८०० मालकांना प्रत्येकी ५० चौरस मीटरची सदनिका मिळेल. या प्रकल्पातून म्हाडाला ४४ हजार चौरस मीटर क्षेत्र मिळून १,०००–१,२०० घरे मिळण्याची शक्यता आहे.
मोतीलालनगर (गोरेगाव पश्चिम): अदाणी समूहाकडून पुनर्विकास होत असून, ३,७०० रहिवाशांना १,६०० चौरस फुटांची घरे दिली जातील. यामध्ये म्हाडाला सुमारे ७,०००–८,००० घरे उपलब्ध होणार आहेत.
जीटीबीनगर: ११.२० एकर क्षेत्रफळावर आधारित प्रकल्पात १,२०० रहिवाशांना ६३५ चौरस फुटांची घरे देण्यात येणार असून, म्हाडाच्या ताफ्यात ७००–८०० नवीन घरे जमा होतील.
या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईतील सामान्य नागरिकांसाठी घर घेणे अधिक सुलभ होणार असून परवडणाऱ्या दरात घरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.