(Photo - X)
मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) समर्थक आणि शिवसैनिकांची सुटका झाल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. मुंबई पोलिसांसोबत चर्चा झाल्यानंतर ताब्यात घेतलेल्या सर्वांना सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहणार असून, उद्यापासून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, अमित ठाकरे यांनी उद्यापासून शिवाजी पार्कवर तीव्र आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. (Mumbai SIR Protest)
शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर शिवसेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला होता. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी आंदोलनात सहभागी होत पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती.
आदित्य ठाकरेंनी ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची सुटका झाल्याची माहिती दिली. याबाबत पोलिसांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. उद्याच्या आंदोलनाचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा निर्णय! ‘उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार’
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील लढा सुरूच राहणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले. देशातील नागरिकांवर दडपशाही होत असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
“तानाशाही मुंबईत खपवून घेतली जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास ते आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईत दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होऊ देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारकडून आंदोलकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले जात असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला.
आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर अमित ठाकरे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी आपण येथे आल्याचे त्यांनी सांगितले.
ताब्यात घेतलेल्या सर्वांची सुटका झाल्याचे नमूद करत अमित ठाकरेंनी उद्यापासून शिवाजी पार्कवर तीव्र आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाचा पुढील टप्पा मुंबईत कसा पार पडतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






