
मुंबई – मुंबईमध्ये (mumbai) सोमवारी रात्रीपासूनच हवेचा दर्जा खालावला आहे. तसे जाणवत असून मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवसभर हवेचा दर्जा घसरलेलाच होता. हवेची गुणवत्ता नोंदविणाऱ्या ‘सफर’ या प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या नोंदणीमध्ये हवेची गुणवत्ता खालावली असल्याचे समोर आले. तर, पुढील दोन दिवस वातावरण असेच राहील, असा अंदाज सुद्धा व्यक्त केला आहे.
‘सफर’ने नोंदविल्याप्रमाणे हवेचा गुणवत्ता निर्देशांक २४५ होता. तर, माझगाव आणि नवी मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता अतिवाईट स्वरूपाची होती. माझगावमध्ये पीएम २.५ चा निर्देशांक ३०० पेक्षा अधिक होता, तर पीएम १० निर्देशांक मध्यम श्रेणीतील होता. कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, अंधेरी, मालाड या केंद्रांवरही मंगळवारी दिवसभरात हवेची गुणवत्ता वाईट नोंदविली गेली. कुलाबा (colaba) येथेही पीएम २.५ प्रदूषके अधिक होती, तर वांद्रे-कुर्ला संकुल केंद्रावर पीएम २.५ आणि नायट्रोजन डायऑक्साइड या दोन्ही प्रदूषकांची श्रेणी वाईट नोंदविण्यात आली.
अंधेरी (andheri) आणि मालाड (malad) केंद्रावरही पीएम २.५ ची पातळी खालावली होती. या केंद्रांवर पीएम १० ची पातळी मध्यम श्रेणीतील नोंदविली गेली. त्याचसोबत मुंबईमधील वरळी (worli) , भांडुप, बोरिवली या केंद्रांवर मध्यम स्वरूपाची हवेची गुणवत्ता होती. सध्या हवेचा वेग मंदावला असल्याने वातावरणात प्रदूषके साचून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस हवेची स्थिती अशीच राहणार असल्याची शक्यता आहे. बुधवारी आणि गुरुवारीसुद्धा मुंबईतील हवेत प्रदूषण जाणवेल असा अंदाज सुद्धा ‘सफर’ तर्फे वर्तविण्यात आला आहे.