मुस्लीम समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी जरांगे पाटील यांची मागणी
जालना : राज्यामध्ये मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण यावरुन वादंग निर्माण झाला आहे. मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे याबाबत जरांगे पाटील आक्रमक आहेत. मराठा समाज कुणबी असून त्यांना सगेसोयरे शब्दासह आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील करत आहेत. दरम्यान, मराठा समजाला वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी लक्ष्मण हाके करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता मुस्लीम बांधवांना देखील ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
13 तारखेच्या आत आरक्षण देणं बंधनकारक
मराठा आरक्षण ओबीसीमधूनच घेणार यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला असून राज्य सरकारवर निशाणा देखील साधला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “सगेसोयरे शब्दांसह आम्हाला आरक्षण पाहिजे. सगेसोयरे शब्दाची अंलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे करा. उधाळलेल्या गुलालाच अपमान करु नका. सगेसोयरे शब्दाची अमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे नाही केली तर विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसंल. हे लक्षात ठेवा. सरकारला आम्हाला येत्या 13 तारखेच्या आत आरक्षण देणं बंधनकारक आहे. जे बोगस आहे ते दिलं आणि जे सत्य आहे ते दिलं नाहीत,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मुस्लीमांदेखील ओबीसी आरक्षण द्यावे
जरांगे पाटील म्हणाले, “हैद्राबाद संस्थानच्या नोंदी तालुक्या तालुक्यांमध्ये गावागावांमध्ये आहेत. या सरकारी नोंदी आहेत. यातील एकही नोंद खोटी नाही. आमच्या या नोंदी तुम्ही कशा रद्द करता तेच मी बघतो. या देशामध्ये कोणाचाही सरकारी नोंदी नाही तरी त्यांना आरक्षण आहे. मात्र मराठ्यांना सरकारी नोंदी असून आरक्षण नाही. तसेच सरकारी कुणबी नोंदी या मुस्लीम समाजाच्या देखील निघाल्या आहेत. जर कुणबी म्हणून मारवाडी, ब्राम्हण आणि लिंगायत समाजाच्या देखील नोंदी निघाल्या आहेत. जर या सरकारी नोंदी मिळाल्या आहेत तर मुस्लीमांना सुद्धा ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला आहे. मुस्लीमांची नोंदी जर कुणबी म्हणून निघाली असेल तर राज्यातील सर्व मुस्लिमांना सुद्धा ओबीसी म्हणून आरक्षण दिले पाहिजे.आता फक्त कायदेने बोला,” असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.