Nagpur: One person was killed and three others were seriously injured in a two-truck accident on the Nagpur-Wardha highway
सेलू : वर्धेवरून कोंबड्या घेऊन नागपूरला जात असलेल्या ट्रक क्रमांक सीजी ०८ एएल ५५४४ ला सोयाबीन घेऊन राजनांदगाव येथे जात असलेल्या भरधाव ट्रक क्रमांक एम.एच. ३७ टी १५२१ ने मागून जोराची धडक दिली. यात धडक मारणाऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला तर तीन किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी १८ मे रोजी सकाळी नागपूर- वर्धा महामार्गावर सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
रवी रामनाथ सहारे (वय ३३) रा. वाई रुई जिल्हा यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. घटनेचे सविस्तर व्रत्त असे की, अशोक लेलँड ट्रक क्रमांक सीजी ०८ एएल ५५४४ हा वर्धा येथून कोंबड्या भरून नागपूरला जात होता. तर मागून ट्रक क्रमांक एम.एच. ३७ टी १५२१ हा वाशीम येथून सोयाबीनचे पोते भरून राजनांदगाव छत्तीसगड येथे भरधाव जात होता. दरम्यान, सेलू नजीकच्या कान्हापूरजवळ कोंबड्या असलेल्या ट्रकला सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकने मागून जबरदस्त धडक दिली. त्यात धडक मारणाऱ्या ट्रकचा चालक रवी रामनाथ सहारे (वय ३२) रा. वाई रुई जि. यवतमाळ हा जागीच ठार झाला. तर त्याचा वाहक शेख वकील (वय ४५) रा. वाई रुई जि. यवतमाळ हा किरकोळ जखमी झाला आहे.
ट्रकचा झाला चेंदामेंदा
कोंबड्या असलेल्या ट्रकमधील चालक लोकनाथ श्रीवास (वय ३६) व वाहक किरण वर्मा (वय ३६) हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा जबरदस्त होता की, धडक मारणारा ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा होऊन रोडच्या बाजूला जाऊन पलटी झाला.
शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
कोंबड्या असलेल्या ट्रकच्या मागील भागाचे नुकसान झाले असून, शेकडो कोंबड्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक गजानन कंगाले व वणवे यांनी घटनास्थळी जाऊन उपस्थितांच्या मदतीने मृतकाला बाहेर काढून टोलनाक्यावरील अंब्युलन्सद्वारे मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.