पुरुष नसबंदीचं प्रमाण नक्की किती? महाराष्ट्रातील या जिल्ह्यात इतक्या पुरुषांनी केली नसबंदी
जंगलाचा प्रदेश, भाताची शेती आणि घाणपाणी तुंबणे यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून हत्तीपायाचे 3026 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. हत्तीपाय रुग्णांना पायाच्या सुजेवरून तीव्रता तपासणी करून त्यानुसार दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येते. क्युलेक्स या जातीच्या डासांपासून हत्तीपाय, अंडवृद्धी आणि जपानी मेंदूज्वर होतो. क्युलेक्सच्या अनेक प्रजाती आहेत.
क्युलेक्सच्या प्रजातीच्या डासांचा नेहमी प्रादुर्भाव असणा-या भागात आरोग्य विभागाकडून डासांचे नमुने गोळा करून त्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण केले जाते. त्यानुसार धोकदायक डासांचे प्रमाण असणाऱ्या भागात कीटकनाशक फवारणीसोबत नागरिकांना मच्छरदाण्यांचे वाटप केले जाते. परंतु तरीही हत्तीपायासारख्या आजारांचे प्रमाण अपेक्षेएवढे कमी झालेले नाही. गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती, जंगलाचे प्रमाण आणि साचून राहणारे अस्वच्छ पाणी ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. शहरी भागात प्रत्येक घरात शौचालयांच्या पाईपवर जाळ्या बसविण्यात आल्याने शहरी भागात याचे प्रमाण कमी आहे. मात्र ग्रामीण भागात हत्तीपाय रुग्णांची संख्या अधिक आहे.
हत्तीरोग हा दुर्लक्षित आजार असून त्याच्या ठराविक वृद्धीनंतर रुग्णांच्या हालचालीवर कमालीची बंधने येतात. त्यामुळे तो मुक्तपणे फिरू शकत नाही. पायांवर सूज येणे, ताप येणे, पाय लालबुंद होणे, पायाच्या दोन बोटांमध्ये चिखल्या आजाराप्रमाणे जखमा होते, अशी टप्प्याटप्प्याने रुग्णांत लक्षणे दिसून येतात. गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यात 3026 हत्तीपाय रुग्ण असून; यात 708 पुरुष व 2318 महिला रुग्णांचा समावेश आहे.
हत्तीपायाच्याडासांचा दंश झाल्यानंतर थोडा ताप येतो. पण 18 महिन्यांपर्यंत ठळक लक्षणे दिसत नाहीत. विशेष म्हणजे, या कालावधीत त्या व्यक्तीला दंश करणाऱ्या डासांमार्फत हत्तीपायाचे जंतू इतरांच्या शरीरात जावू शकतात. 18 महिन्यानंतर मात्र हत्तीरोग झालेल्या व्यक्तीमार्फत आजार पसरत नाही.
एमएमडीपी किट हत्तीपाय रुग्णांसाठी आधार
हत्तीपाय रुग्णांसाठी शासनाकडूनएमएमडीपी किट उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या राऊंडमध्ये ही किट रुग्णांना वाटप करण्यात आली आहे. या किटमध्ये रुग्णासाठी साबण, टॉवेल, कापूस, बकेट व मग या वस्तुंचा समावेश आहे. ही किट कशापद्धतीने वापरायची कर्मचारी स्वतः त्यांचे ‘पायधुणी’ कार्यक्रम करून प्रात्यक्षिक करून दाखवितात. रुग्णांच्या घरी जावूनही किट वापराबाबत मार्गदर्शन करतात.