'गाफील राहू नका, विधानसभा निवडणुकीसाठीही जोमाने काम करा'; नाना पटोलेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. असे असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना गाफील राहू नका, विधानसभा निवडणुकीसाठीही जोमाने काम करा, असे आवाहन केले आहे.
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘भाजप धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. भाजप देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्याचे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस व इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली’.
तसेच लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका. विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत करा, जनतेपर्यंत जा व काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.
जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष
काँग्रेस सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरातील विविध पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली व राज्यात महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली.
राज्यातही परिवर्तन व्हावे ही जनतेची भावना
लोकसभा निवडणुकीत दलित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक समाज, महिला, तरुणांचा कौल इंडिया आघाडीला मिळाला व आता राज्यातही परिवर्तन व्हावे ही जनतेची भावना आहे, आपण जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. पक्षासाठी काम करा व विधानसभेवर काँग्रेसच्या विजयाची पताका फडकवा असे आवाहनही पटोले यांनी केले.