ऐन निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; हिना गावीत यांची बंडखोरी
ऐन निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारमधील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी बंडखोरी केली आहे. भापजने हिना गावित यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातन त्या अपक्ष निवडणूक लढणार आहेत.
हेही वाचा-Maharashtra Election: “यंदा भाजपचाच मुख्यमंत्री”; राज ठाकरेंचे सूचक विधान येताच देवेंद्र फडणवीसांनी…
महायुतीत अद्यापही काही जागांवर तिढा कायम आहे. या मतदारसंघांमध्ये बंडखोरी होण्याची शक्य होती आणि त्याची सुरुवातही झाली आहे, आधीच पाच जागांवर महायुतीतील पक्ष एकमेकांविरोधात आहेत. आता हिना गावित यांनीही बंडखोरी केली आहे. त्या अक्कलकुवा अक्राणीमधून शिंदे गटाचे उमेदवार आमश्या पाडवी, काँग्रेसचे के. सी. पाडवी यांच्या विरोधात लढणार आहेत. महायुतीतून शिंदे गटाला ही जागा मिळाली असून विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
डॉ. हीना गावित यांनी २८ तारखेला अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आणि अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र जागावाटापात ही जागा शिंदे गटाला सुटली होती. मात्र शिंदे गटातर्फे ज्यांना उमेदवारी जाहीर झाली ते आमश्या पाडवी विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना पु्न्हा उमेदवारी का? अशी विचारणा त्यांनी पक्षाकडे केल होती. ही जागा भाजपला द्या, आम्ही उमेदवार निवडून आणू, असा आग्रह धरला होता. अखेर त्यांनी भाजपकडून भरलेला अर्ज बाद झाला. महाआघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. त्यामुळे के. सी. पाडवी यांचे हिना गावित यांना मोठं आव्हान असणार आहे.
ऐन दिवाळीत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आहे. काल अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. २८८ जागांसाठी सुमारे १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन प्रमुख आघाड्यांसह मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्थानिक आघाड्या, छोटे पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. दरम्यान आपल्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळेल अशा अपेक्षेत असलेल्या इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अखेरच्या दिवशी बंडखोरीचा मार्ग पत्करला आहे.
कित्येक दिवसांच्या चर्चा आणि बैठकांनंतरही महायुतीतील प्रमुख पक्ष जागावाटपात योग्य समन्वय साधू शकले नाहीत. शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार निश्चित झालेले नव्हते, त्यामुळे एकाच मतदारसंघात दोन-दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ४ नोव्हेंबरपर्यंत काही जण उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. मात्र सध्याच्या घडीला ५ मतदारसंघांमध्ये महायुतीचेच उमेदवार आमने सामने आले आहे. भाजपने अशा मतदारसंघांमध्ये फ्रेंडली निवडणूक लढवली जाईलं असं म्हटलं आहे.