
ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन
नंदुरबारमध्ये शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी रत्नाताई रघुवंशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर शिवसेनेकडून सर्व पॅनल उभे करण्यात आले आहे. शहराच्या विकासासाठी आणि विजयाची संकल्प सभा आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक योजना राज्यात राबवल्या. लाडकी बहिण’ ही योजना त्यांनी सुरू केली आणि जी आजही अविरतपणे सुरु आहे. लाडकी बहिण योजना बंद होऊ देणार नाही हा एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात दिवस-रात्र काम करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख निर्माण झालीय. मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्याची दारे २४ तास खुली ठेवून त्यांनी लोकांसाठी सेवा केली. सण असो वा शेतकऱ्यांचे प्रश्न, गरीबांवरील संकट शिंदे साहेब सर्वात आधी संकटग्रस्तांच्या दारी मदत घेऊन पोहोचले, हे महाराष्ट्राने पाहिलं. येत्या काळातही शिंदे साहेबांचा हा प्रवास तितकाच वेगवान असून, दिवसाला आठ सभा घेत असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. मागील तीन वर्षांत शिवसेना राज्याच्या दुर्गम भागात पोहोचली. कार्यकर्ता जगला तर पक्ष वाढतो म्हणून कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम करतोय, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. जसा विश्वास आपण विधानसभेत दाखवला, तसाच विश्वास पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांना केले.
तसेच जिल्ह्यात वॉटर पार्क असलेली एकमेव नगरपरिषद म्हणून नंदुरबारची ओळख आहे. ठाणे–मुंबईमध्ये जशी विकासकामे केली तशीच नंदुरबार नगरपरिषदेसाठीही कामे करु आणि शहराचा चेहरा मोहरा बदलू, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले.