रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक 2024 मध्ये खासदार नारायण राणे बहुमताने निवडून आले. पण त्याच काळात पैसे वाटून मते विकत घेतली, त्यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांनी राणेंच्या विजयाला आव्हान देत थेट उच्च न्यायालयात निवडणूक याचिक दाखल केली आहे.
नारायण राणे यांनी मतदारांना पैसे वाटून मते विकत घेतली त्यामुळे मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करा, निवडणूक काळातील त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी, असे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाराऱ्यांकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
तसेच, जाणीवपूर्वक आचारसंहितेचे नियम पायदळी तुडवले गेले. निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनीही हरताळ फासल्याचा आरोप याचिकेतून विनायक राऊत यांनी केला आहे.
दाखल केलेल्या याचिकेत, 5 मे 2024 रोजीच निवडणूक प्रचाराचा कालावधी संपला होता. पण तरीही 6 मे ला नारायण राणे प्रचार करत राहिले. नारायण राणेंचे समर्थक प्रचार कालावधी संपलेला असतानाही ईव्हीएम मशीन दाखवून राणे साहेबांनाच मतदान करा, असे सांगून पैसे वाटत असल्याचा व्हिडीओही सोशल मिडीयवर व्हायरल झाला होता.
नितेश राणे यांनी तर जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावल्याचेही व्हिडीओ व्हायरल झाले होते. “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचे नाही, आणि तो मिळणारही नाही, अशी जाहीर धमकीच त्यांनी 13 एप्रिलला घेतलेल्या सभेत दिली होती, असेही या याचिकेत सांगण्यात आले आहे.