
नैसर्गिक आपत्तीचा ३,८१८ हेक्टरला फटका
गडचिरोली : जून ते ऑगस्ट आणि वीज पडण्यामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३ हजार ८१८.१३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, ५ हजार २८१ शेतकरी बाधित झाले आहेत. जून महिन्यात नुकसानीची नोंद नसली, तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये नैसर्गिक आपत्तीचा शेतीला मोठा फटका बसला.
जुलैमध्ये जिल्ह्यातील २ हजार ९८०.३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ४ हजार २४३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ऑगस्टमध्ये आणखी ८३७.८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, १ हजार ३८ शेतकरी बाधित झाले. त्यामुळे या दोन महिन्यांतील एकत्रित नुकसान ३ हजार ८१८.१२ हेक्टर आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या ५ हजार २८१ इतकी झाली आहे. तालुकानिहाय पाहता सिरोंचा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. सिरोंच्यात जुलैमध्ये ८२.९४ हेक्टर, तर ऑगस्टमध्ये तब्बल ८३१.१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यामुळे एकूण ९१४.०४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊन २ हजार ५८ शेतकरी बाधित झाले आहेत.
दरम्यान, ऑगस्टमधील जिल्ह्याच्या एकूण नुकसानीत सिरोंचा तालुक्याचा मोठा वाटा आहे. चामोर्शी तालुक्यात ८३९.७५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, १ हजार ६६ शेतकरी बाधित झाले आहेत. भामरागडमध्ये ४१०.९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊन ५७६ शेतकरी बाधित झाले. गडचिरोली तालुक्यात २६६.०६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, ५०९ शेतकरी बाधित झाले आहेत.
अहेरीत २४१.४२ हेक्टर क्षेत्र बाधित
अहेरीत २४१.४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, २४७ शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत. याशिवाय देसाईगंजमध्ये १४३ हेक्टर व २६८ शेतकरी, कुरखेड्यात १२०.३ हेक्टर व २६८ शेतकरी, मुलचेरात ४५.५२ हेक्टर व ९३ शेतकरी, तर धानोरात ५ हेक्टर व ९ शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे. कोरचीत ऑगस्टमध्ये ६.७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
पावसाच्या दडीने शेतकरी चिंताग्रस्त
जून ते ऑगस्टदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातूनही शेतकऱ्यांनी कसाबसा पिके वाचविली. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस लांबल्याने शेतातील धान पिकावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. पिकांच्या वाढीसाठी सध्या पावसाची नितांत गरज असून, पावसाअभावी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.