
सांगली : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला अखेर मुहर्त गवसला. तामिळनाडूतील तंजावर ते रत्नागिरी दरम्यान पार पडणाऱ्या या संमेलनाची घोषणा अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे मुंबईत करण्यात आली. नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ दि. २९ डिसेंबर रोजी सांगलीत होणार आहे, असेही सांगण्यात आले.
तंजावर येथे ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा प्रारंभ ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे सुरू होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे होणार आहे. या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन होणार आहे.
पिंपरी-चिंचवड येथे ६ जानेवारी २०२४ रोजी नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. ७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर, २७ आणि २८ जानेवारी सोलापूर, ४ फेब्रुवारी बीड, १० व ११ फेब्रुवारी २०२४ लातूर १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी नागपूर आणि मुंबई येथे नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले यांनी दिली.
महाराष्ट्रातील २२ केंद्रांवर प्राथमिक फेरी
नाट्य कलेचा जागर या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित केला आहे. त्यामध्ये खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील २२ केंद्रांवर होणार आहे. निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे मार्च महिन्यात होणार आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल संमेलनाध्यक्ष
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व मुख्य निमंत्रक उदय सामंत आहेत.