
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर5 ऐरोली येथे नवीन नाट्यगृहाचे बांधकाम सुरू असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध अभिनेते श्री प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करत समाधान व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहातील व्यवस्था आणि यंत्रणेचे श्री. प्रशांत दामले नेहमीच विविध ठिकाणी भरभरून कौतुक करीत असतात. तशाच प्रकारे ऐरोली नाट्यगृह देखील आवश्यक सुविधांनी सुसज्ज असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व तेथे आवश्यक सुविधांविषयी काही सूचना केल्या. नाट्यगृहामध्ये ध्वनी संयोजन व ध्वनी संतुलनासाठी ऍकॉस्टिक व्यवस्था, प्रकाश योजना, कलावंत रंगभूषा कक्ष, बैठक व्यवस्था, प्रसाधनगृह व्यवस्था या महत्त्वाच्या सुविधा असून त्यांची गुणवत्ता चांगली राखावी अशी सूचना त्यांनी केली.
प्रेक्षागृहातील आसन व्यवस्थेबाबतही त्यांनी काही महत्वाच्या बाबींविषयी सूचना केल्या. नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृह हे उत्तम सुविधांनी परिपूर्ण असे राज्यातील एक महत्त्वाचे नाट्यगृह मानले जाते. याठिकाणी कला व संस्कृतीप्रेमी रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद लाभत असतो. नवी मुंबई शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथे 860 आसन क्षमतेचे नवीन नाटयगृह उभारण्याचे काम सुरु आहे.
या बांधकामाची नुकतीच पाहणी करुन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कामाची गुणवत्ता राखत गती द्यावी व नवीन वर्षाच्या प्रारंभापर्यंत काम पूर्ण करण्याचे कालबध्द नियोजन करावे असे निर्देश दिले होते.रंगभूमीवर अनेक विक्रमी नाटके सादर करून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष .प्रशांत दामले यांनी ऐरोली नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले व चांगले काम सुरू आहे असा अभिप्राय दिला. आगामी काळात ऐरोली येथील नाट्यगृह म्हणजे नवी मुंबईसह शेजाच्या शहरांतील नाट्यरसिकांसाठीही पर्वणी ठरणार आहे.