बीड : लोकसभा निवडणुकीमध्ये बीडची निवडणूक देखील प्रतिष्ठेची ठरली होती. महायुतीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी एवढ्या दिवस विरोधक म्हणून काम करणारे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रचार केला. बैठका आणि सभांचे सत्र चालू ठेवले. धनंजय मुंडे यांच्या अथक प्रयत्नानंतर देखील बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवाने हे ६ हजार ५५३ मतांनी विजयी झाले. या पराभवानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत.
धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत बीडमधील पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. ते म्हणाले, ‘पंकजा मुंडेंच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. या पराभवाचं मला दु:ख आहे. आणि खंत आहे. बीडच्या जनतेचे मी आभार मानतो की देशात सर्वाधिक मतदान झालेल्या पहिल्या बारा उमेदवारांमध्ये आमच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं. त्यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला याचं दु:ख मला आहे.”असे मत त्यांनी मांडले.
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले?
पुढे ते धनंजय मुंडे म्हणाले, “लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचं नुकसान झालं आहे. विधानसभेत चित्र काय असेल ते मी आजच सांगत नाही. येणारा काळ ठरवेल. आज त्यावर बोलणं फार लवकर होईल. तीन महिने जायचे आहेत. तीन महिन्यांनंतर महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना तेव्हा काय असेल, याची चिकित्सा आज होऊ शकत नाही”, असे मत धनंजय मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुतीबाबत मांडले.