पुणे : लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. सर्वच लोकांचे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. शरद पवार गट व अजित पवार गटासाठी बारामती लोकसभा मतदार संघ प्रतिष्ठेची लढाई ठरला होता. बारामती येथील निकालावर अजित पवार यांचे राजकीय भविष्य ठरवले जाणार आहे. सुप्रिया सुळे या सध्या आघाडीवर असून विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांशी संवाद साधला आहे. तसेच जनेतेचे आभार मानले आहेत.
अंदाजापेक्षा वेगळा निकाल जनतेने दिला
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या जनतेचे महाविकास आघाडीला कणखर साथ व पाठिंबा दिल्याबद्दल आभार म्हटले आहे. शरद पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये एकप्रकारे परिवर्तनाला पोषक ठरणारा निकाल आहे. जाती धर्माच्या पुढे जाऊन रोजगार महागाईच्या मुद्द्यावर जनतेने कौल दिला. ही लोकसभेची निवडणूक झाली त्यामधील निर्णय या देशपातळीवर असणारा आशादायक निर्णय आहे. विषेशत: उत्तर प्रदेशमध्ये जे काही अंदाज बांधण्यात आले त्यापेक्षा वेगळा निकाल जनतेने दिला आहे. या पूर्वी भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मिळणारं यश मोठ असायचं. त्यानंतर आता मर्यादित जागा मिळवल्या आहेत. याचा अर्थ आमचे काम अधिक लोकांना आवडत आहे,”
हे आमचं एकट्याचं यश नाही
यापुढे शरद पवार म्हणाले, “मी निकाल आल्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी आणि अन्य यांच्यासोबत चर्चा केली. उद्या आमची दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. उद्याच्या बैठकीमध्ये सामुदायिक पद्धतीने पुढची रणनीती आणि धोरण ही चर्चा करुन ठरवू. या निवडणूकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगली लढत दिली. आम्ही 7 जागांच्या वर आमचा विजय होण्यात जमा झाला आहे. आमच्या आघाडीमधून एकत्रित जीवाभावाने काम करण्याची तयारी दाखवली. म्हणून हा विजय आम्हाला मिळाला. हे आमचं एकट्याचं यश नसून महाविकास आघाडीचं यश आहे. यापुढे देखील आम्ही जनतेची सेवा करण्याची धोरण ठरवू आणि खबरदारी घेऊ,”असे मत त्यांनी मांडले.
बारामतीकरांची मानसिकता मला माहिती
सुप्रिया सुळे यांचा विजय जवळ जवळ निश्चित झाला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “माझं स्वतःचं निरिक्षण या मतदारसंघाचं असल्यामुळे या निर्णायाच्या याच्या पेक्षा वेगळा निकाल कधी लागेल असं मला कधीचं वाटलं नव्हतं. आणि बारामती हा विधानसभेचा मतदारसंघ आहे तिथे माझं मागील 60 वर्षांपासूनचं काम आहे. माझी सुरुवात तिथूनच झाली होती. त्यामुळे येथील सामान्य माणसांची काय मानसिकता आहे ते मला ठाऊक आहे. मी जावो किंवा न जावो ते योग्य निर्णय घेतील याची खात्री आहे. त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. एका विधानसभेच्या 35 हजारच्या पुढे लीड आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
मी चंद्रबाबूंना फोन केला नाही
राज्यातील नेत्यांच्या चर्चांविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, “मी फक्त कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व सीताराम येचुरी यांच्याशी संवाद साधला. मी इतर कोणाशी संपर्क साधलेला नाही. मी चंद्रबाबूंना फोन केला यामध्ये काहीही तथ्य नाही. असे स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले. पुढे त्यांना नितिश कुमार यांची मदत पुढे मिळेल का याबाबत सवाल विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, याबाबत माहिती नाही. माझे त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. ते एका राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी माहिती असल्याशिवाय कमेंट मी करणार नाही. माझा आणि त्यांचा सुसंवाद आता काहीही झालेला नाही,” असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केला.