ncp Rupali Patil Thombre meets Kaspate family in Vaishnavi Hagavane suicide case
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचा पुण्यासह संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. वैष्णवी हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुळशी तालुकाध्यक्ष होते. या प्रकरणानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते वैष्णवी हगवणे हिच्या माहेरच्या लोकांच्या घरी दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कास्पटे कुटुंबियांची भेट घेतली आहे. पिंपरी चिंचवडमधील कास्पटे कुटुंबियांच्या घरी रुपाली पाटील दाखल झाल्या. त्यांनी वैष्णवीच्या आई वडीलांची भेट घेतली आहे. या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी दोन नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. त्यापैकी एक रुपाली पाटील आहेत. त्यांनी वैष्णवीचे बाळ तिच्या घराच्यांना मिळवून देण्यासाठी देखील पूर्ण प्रयत्न केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हगवणे कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं पाठबळ देण्यात आलेलं नाही. आरोपींच्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुस्क्या आवळल्या जातील. अजित पवार यांनी देखील हे स्पष्टपणे सांगितले आहे की हगवणे यांना कोणताही राजकीय पाठबळ दिलेले नाही. आम्ही देखील आता आई म्हणून इथे आलो आहोत,” असे मत रुपाली पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पुढे त्या म्हणाले की,” वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. तिचं नऊ महिन्यांचं बाळ आहे. मात्र कायद्याने वडील हे मुलाचे पालक असतात मात्र बाळाचे वडील अटकेमध्ये आहे. मुलाची आई या जगामध्ये नाही. बाळाचे आजोबा फरार आहे तर आजी जेलमध्ये आहे. यामुळे बाळाची जबाबदारी ही वैष्णवीच्या माहेरकडच्यांकडे येते. पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः बाळ सोपवण्याचे आदेश दिले आहेत,” अशी माहिती रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यांचा फॉरच्युनर गाडीची चावी देताना फोटो देखील व्हायरल झाला आहे. याबाबत बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “हगवणे परिवाराला कोणतही राजकीय पाठबळ नाही हे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. लग्न समारंभामध्ये राजकीय नेत्यांना बोलावणे आणि निमंत्रित केले जाते. प्रत्येकजण बोलवतात. परंतू त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काय अडचणी होतात या नेत्यांवर किंवा आलेल्या पाहुण्यांवर लादू शकत नाही. या हुंडाबळीला राजकीय पाठबळ असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे, मत राष्ट्रवादी रुपाली पाटील ठोंबरे यांनी अधोरेखित केले आहे.