No need to ally with anyone to win - believes Chandrasekhar Bavankule
यवतमाळ : ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतरच निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल. पण अगदी उद्या जरी निवडणुका झाल्या तरी भारतीय जनता पार्टी बहुमताने जिंकून येईल. त्यासाठी कुणाशीही युती करण्याची गरज नाही. भाजपाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येणार असल्याचा विश्वास माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत वेळकाढूपणा केला. त्याचमुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर पडल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
येत्या २५ एप्रिलला ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होणार आहे. जर न्यायालयाने वेळ वाढवून दिली तर निवडणुका पुढे ढकलल्या जातील. अन्यथा तात्काळ निवडणुका जाहीर होतील, असे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महत्वाचे म्हणजे आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीची तयारी पूर्ण झाली आहे. विजय खेचून आणण्यासाठी कुणाशीही युती करण्याची गरज नसल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
ओबीसींच्या भल्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पूर्ण सहकार्य केले. बहुमताने कायदा पारित करवून घेतला. पण ओबीसींचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकविता आले नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडणे अपेक्षित होते. केवळ दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसींच्या आरक्षणात अडचणी निर्माण झाल्या. त्याचवेळी राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला गांभीर्याने घेतले असते तर राज्यात होऊ घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असता असे, बावनकुळे म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडीने ओबीसी समाजावर केवळ अन्याय केला असून, राज्य सरकारचा दुटप्पी चेहरा समोर आल्याचे बावनकुळे म्हणाले.