
दिवाळीत एसटीच्या ऑनलाईन बुकिंगला पसंती; तब्बल 21.44 कोटींची झाली तिकीट विक्री
मुंबई : स्वस्त आणि किफायतशीर प्रवास म्हणून लालपरी अर्थात एसटीला प्राधान्य दिलं जात आहे. त्यातच राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात असल्याने एसटीतून प्रवास करणारे अनेकजण आहेत. असे असताना एसटी महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला यंदाच्या दिवाळी सणाच्या काळात विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांनी दाखवलेल्या या प्रचंड विश्वासामुळे महामंडळाच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.
केवळ ऑनलाईन तिकीट विक्रीतून 21 कोटी 44 लाख 13 हजार 191 रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्याअंतर्गत सर्वच व्यवहारामध्ये डिजिटलचा वापर वाढविण्यात येत आहे. चहाच्या टपरीपासून ते भाजीवाल्यांपर्यत डिजिटल पेमेंटचा पर्याय सध्या वापरण्यात येतो. यामुळे नागरिकांना देखील सुट्टे पैसे सोबत बाळगण्याची आवश्यकता भासत नाही. एसटी महामंडळाने देखील केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाचा एक भाग होत डिजिटल तिकिटांवर भर दिला आहे. या डिजिटल तिकिटाला राज्यातील नागरिकांची पसंती मिळत आहे.
हेदेखील वाचा : Cabinet Meeting: 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय
प्रवाशांचा वाढता प्रतिसाद एसटी महामंडळासाठी एक आर्थिक संजीवनी ठरला आहे. ऑनलाईन तिकीट विक्री प्रणाली अधिक प्रभावी, सुरक्षित आणि जलद झाल्यामुळे राज्यातील कोट्यवधी प्रवाशांचा ‘लाल परी’वरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. डिजिटल तिकीट बुकिंगच्या माध्यमातून ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंतच्या प्रवाशांनी महामंडळाच्या या सुविधेचा पुरेपूर लाभ घेतला.
ऑनलाईन तिकीट बुकिंगची आकडेवारी (17 ते 28 ऑक्टोबर 2025)
तिकीट विक्री : ४४१४७४
आसन क्षमतेचा वापर: ५५६४२८
महसुल (रुपये) : २१४४१३३९१
ऑनलाईन तिकीट बुकिंगची आकडेवारी (28 ऑक्टो. ते 8 नोव्हेंबर 2025)
तिकीट विक्री : ३५९९८१
आसन क्षमतेचा वापर : ५५६४२८
महसुल (रुपये) : १६६६५३७४५
हेदेखील वाचा : MSRTC Revenue: ‘एसटी’ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा…