पोलिसांवर वाढतोय ताण; एक लाख लोकसंख्येसाठी केवळ 172 कर्मचारी
मुंबई / नितीन पाटील : कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलीस दलावर आहे, त्यांच्यावरील कामाचा ताण सातत्याने वाढत आहे. राज्याची एकूण लोकसंख्या आणि उपलब्ध एकूण पोलिस दल यांचा विचार करता तब्बल एक लाख लोकसंख्येच्या रक्षणासाठी केवळ 172 पोलिस उपलब्ध आहेत, ही बाबच पोलिसांवरील वाढता ताण दर्शवणारी आहे.
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी ८३ लाख इतकी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी राज्यात माहिती अधिकाराखाली प्राप्त माहितीनुसार, २०२४ च्या आकडेवारीचा विचार केला असता राज्यात प्रत्यक्ष पोलिस संख्याबळ १ लाख ९८ हजार ८७० इतके आहे. म्हणजेच एक लाख लोकसंख्येमागे १७२ पोलीस आहेत. तर महिला पोलिसांची संख्या ३६ हजार ९ इतकी असून, एकूण उपलब्ध पोलिस संख्याबळाच्या तुलनेत महिला पोलिसांचे प्रमाण १८.११ टक्के इतकेच राहिले आहे.
मुंबईसाठी ५१ हजार पोलिस तैनात
मुंबई महानगरीतील जनतेच्या रक्षणाचे काम ५१ हजार ३०९ अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत. मुंबईत एक लाख लोकसंख्येमागे पोलिसांचे प्रमाण केवळ २७० इतकी आहे. देशाचा विचार करता देशाची एकूण लोकसंख्या आणि तैनात पोलिस दल विचारात घेता देशात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या निकषानुसार हे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे किमान २२२ इतके असणे आवश्यक आहे.
पदे विनाविलंब भरणे अपेक्षित
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पोलिसांच्या संख्येत लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ करणे आणि ती पदे विनाविलंब भरणे अपेक्षित आहे. त्याहूनही सदस्थितीत रिक्त असणारी पदे विनाविलंब अगोदर भरणे अत्यंत गरजेचे आहे. की ज्यामुळे पोलिसांवरील कामाचा वाढता ताण काहीसा हलका होऊ शकेल, असे बोलले जात आहे.
मनुष्यबळ कमी; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम
गृह विभागाच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात पोलिसांवरील कामाच्या जबाबदारीचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासह खासगी तसेच सार्वजनिक मालमत्तेला संरक्षण देणे, वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थेत चालू ठेवणे, स्फोटक पदार्थांची तपासणी करणे, पूर्व चारित्र्य तपासून पाहणे ही अनेक महत्त्वाची कामेही पोलिसांना करावी लागतात. या व्यतिरिक्त सामाजिक, आर्थिक बाबी विविधरित्या कार्यान्वित करण्यासाठी सुद्धा पोलिसांना कामगिरी बजवावी लागते. पोलिसांवर इतका कामाचा मोठा बोजा असताना मनुष्यबळ कमी असल्याने त्याचा परिणाम पोलिसांच्या कार्यक्षमतेवर होत आहे.
जिल्हानिहाय एक लाख लोकसंख्येसाठी कर्मचाऱ्यांची संख्या
– पालघर : ५३
– गडचिरोली : ४२८
– नागपूर : २८७
– मुंबई : २७०
– अमरावती : २१३
– नवी मुंबई : २११
– पुणे : २०४
– संभाजीनगर : २०३
– सोलापूर : १८७
– पिंपरी चिंचवड : १७६
– नाशिक : १७५
– ठाणे : १५९