
फोटो सौजन्य - Social Media
या पुरस्काराचा उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शिवारात नवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणे, कमी खर्चात जास्त नफा देणाऱ्या शेतीपूरक उद्योगांना चालना देणे आणि आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. शेडनेट भाजीपाला लागवड, फुलशेती, उच्च उत्पादनक्षम पद्धती, नवकल्पक सिंचन तंत्र, प्रक्रिया उद्योग, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम संवर्धन अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केलेल्या शेतकऱ्यांना या पुरस्कारासाठी पात्रता असेल. यासोबतच कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ, ग्रामीण भागात कृषी तंत्रज्ञान पोहोचवणारे विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील गौरव केला जाणार आहे. तसेच शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील विधवा शेतकरी महिलांनी केलेल्या दृढ प्रयत्नांना आणि शेतीतील धाडसी नेतृत्वाला विशेष प्रोत्साहन म्हणून स्वतंत्र गटामध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावांची गटनिहाय निवड राज्यस्तरीय समितीद्वारे करण्यात येईल. निवड झालेल्या सर्व मान्यवरांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रस्ताव पाठविताना अर्जदारांनी गटनिहाय संपूर्ण माहिती, शेतातील कार्याचे तपशील, नवकल्पनांचे वर्णन, आर्थिक व उत्पादनवाढीची माहिती जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तीन पासपोर्ट साईज फोटो (पाठीमागे नाव लिहिलेले), मोबाईल क्रमांक, पूर्ण पत्ता आणि आधारकार्डाची प्रत सादर करणे बंधनकारक आहे. प्रस्ताव संबंधित सरकारी विभागाकडून प्रमाणित केलेला असावा, अशी सूचनाही प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे.
सर्व प्रस्ताव १५ डिसेंबर २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे: रशेतीमित्र अशोक वानखेडे, अध्यक्ष (भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान), कृषी महाविद्यालय, उमरखेड, जिल्हा यवतमाळ – ४४५२०६.
महिला शेतकरी, नवकल्पक प्रयोगशील शेतकरी, कृषी संशोधन करणारे शास्त्रज्ञ, कृषी विस्तार करणारे अधिकारी, तरुण उद्योजक, आणि कृषी विषयात उल्लेखनीय पत्रकारिता करणारे माध्यम प्रतिनिधी अशा विविध गटांमध्ये प्रस्तावांची निवड केली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील मेहनती, नाविन्यपूर्ण आणि समाजहिताचे कार्य करणाऱ्यांना न्याय्य मंच देण्याचा आणि त्यांना राज्यपातळीवर ओळख मिळवून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ही उपक्रमशील परंपरा यावर्षीही उत्साहात पार पडणार आहे.