Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था
६ फुटांखालील मूर्तीच्या विसर्जनासाठी विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. यामध्ये नेताजी सभाषचंद्र बोस मैदान, एसटीची मोकळी जागा, भाईंदर पूर्वेकडील बाळासाहेब ठाकरे मैदान, मेजर ध्यानचंद मैदान, जेसल पार्क चौपाटी, बालाजी मैदान, मीरा रोड येथील डॉन बॉस्को शाळेसमोरील जागा, शिवार गार्डन, मोर्चा गावातील पाटील मैदान, रामदेव पार्क परिसर, भाईंदर पश्चिमेकडील नगरभवन तलाव, भाईंदर पूर्वेकडील जुना नवघर तलाव, एस. एन. कॉलेजसमोरील मैदान, घोडबंदर येथील पद्मावती तलाव, नासका तलाव, काशिमीरा येथील जरीमरी तलाव, मिरागाव येथील सातकरी तलाव आणि पेणकरपाडा येथील सुकाळा तलाव आदी ठिकाणांचा समावेश आहे.
५ नैसर्गिक जलसेत
१९ कृत्रिम तलाव
नैसर्गिक जलस्रोतांमध्ये उत्तन समुद्रकिनारा, भाईंदर पश्चिम खाडी किनारा, भाईंदर पूर्व खाडी किनारा, घोडबंदर येथील रेतीबंदर खाडी किनारा आणि चेना नदी या ठिकाणांचा समावेश आहे. मोठ्या मूर्तीचे विसर्जन या ठिकाणी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी शहरात ९९ हजार १६७ गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन झाले होते. यंदा यात वाढ होण्याची शक्यता पालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व विसर्जनस्थळी पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे.
भक्तांना थेट पाण्यात उतरून मूर्ती विसर्जित करण्यास परवानगी न देता, त्यासाठी विशेष विसर्जन पथके नियुक्त केली जाणार आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांची पथकेही तैनात राहणार असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी प्रत्येक विसर्जनस्थळी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन प्रक्रिया सुरक्षित आणि अपघातमुक्त करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.






