(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
शहरात नियमित स्वच्छता केली जात असतानाही अनेक नागरिकांकडून रस्त्यावर कचरा फेकणे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडणे, रस्त्यालगत कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून रोगराई पसरण्याची आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभेने घनकचरा अधिनियम २०२६ चो प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्लीनअप मार्शल नियुक्तीचा ठराव बहुमताने मंजूर केला आहे. वसई-विरारमधील सर्व नऊ प्रभागांमध्ये वलीनअप मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. आगामी तीन वर्षाच्या कालावधीसाठी हा उपक्रम राबवला जाणार असून, तृतीयपंथींसाठी सुरुवातीला एक वर्ष प्रायोगिक तत्त्वावर काम दिले जाणार आहे.
या निविदेत तृतीयपंथीसाठी ३३ टक्के प्राधान्य ठेवण्यात आले असून उर्वरित संधी महिला बचत गट आणि अन्य पात्र घटकांना दिली जाणार आहे. तृतीयपंथीयांच्या नोंदणीकृत संस्थांनाही या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. नियुक्त कर्मचा-यांना महापालिकेकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून गणवेश, ओळखपत्र आणि सुरक्षा साहित्याचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. वलीनअप मार्शलची जबाबदारी केवळ दंडात्मक कारवाईपुरती मर्यादित न ठेवता स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे.
तृतीयपंथीयांना सन्मानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देत त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले, तर नियुक्त्या पात्रतेचे निकष तपासून पारदर्शक पद्धतीने करण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी स्पष्ट केले.
तृतीयपंथीयांना अशा प्रकारे महापालिकेच्या कामकाजात सहभागी करून घेण्याचा प्रयोग यापूर्वी कटक महापालिकेने २०१९ मध्ये केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०२२ मध्ये तृतीयपंथींना ग्रीन मार्शल आणि सुरक्षा रक्षक म्हणून संधी दिली होती. आता वसई-विरारमध्ये स्वच्छतेसोबतच तृतीयपंथींच्या सन्मानजनक रोजगाराचा नवा अध्याय सुरू होणार आहे.






