Rajkot Fort: फरार जयदीप आपटेच्या अडचणींत वाढ; पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी, 'या' ठिकाणी पथके रवाना
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. हा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे हा अजूनही फरार आहे. मात्र आता जयदीप आपटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जयदीप आपटेविरुद्ध पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली आहे. जयदीप आपटे हा कल्याण परिसरात वास्तव्याला होता. २६ ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे हा कल्याणच्या राहत्या घरातून फरार झाला आहे. मात्र अद्याप जयदीप आपटेचा शोध लागलेला नाही. या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेतील जयदीप आपटेला शोधण्यासाठी पोलिसांनी आता वेगाने तपास सुरू केला आहे. गेले आठ दहा दिवस पोलीस आपटेचा शोध घेत आहेत. मात्र अजूनही त्याचा शोध लागलेला नाही. सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर जयदीप आपटेविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. जयदीप आपटेला शोधण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथके तयार केली आहेत. त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषण आणि पाच पथके मुंबई, ठाणे, कोल्हापूर, कल्याण आणि गोवा या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत.
हेही वाचा: कोण आहे जयदीप आपटे? सिंधुदुर्गात नौदलासाठी छत्रपती शिवरायांचा पुतळा साकारला, कल्याणमधील घराला टाळं
दुसरीकडे या पुतळ्यासाठी बांधकाम सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या डॉ. चेतन पाटीलला पोलिसांनी अटक देखील केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ५ सप्टेंबर पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागितली आहे.
वाढवण बंदराच्या भूमीपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर दौऱ्यावर आले होते. त्यांनी देखील आपल्या भाषणात राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळला त्याप्रकरणी राज्यातील जनतेची आणि शिवभक्तांची माफी मागितली आहे. मात्र विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच घेरलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे या विषयावरून अजून काही काळ सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पाहायला मिळणार आहे. तसेच या घटनेचे राजकारण करू नये असे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे.
हेही वाचा: शिवरायांचा पुतळ्याचे कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे, केतन पाटीलवर गुन्हा दाखल
आठ महिन्यांपूर्वी मालवण येथे नौदल दिन साजरा करण्यात आला. या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र २६ ऑगस्ट २०२४ रोजी किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यामुळे राज्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. तसेच यावरून आता काहीसे राजकरण देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी लवकर लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन भक्कम असा पुतळा उभारण्यात येणार आहे असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.