praful patel target nana patole for cm of maharashtra
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही युतींकडून जोरदार प्रचार सुरु असून जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. पण मुख्यमंत्रिपदावरुन दोन्ही युतींमध्ये चढाओढ सुरु आहे. महाविकास आघाडीकडून आधीपासून मुख्यमंत्रिपदावरुन वादंग निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करीत ‘मीच मुख्यमंत्री होणार’ असे विधान केले. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावरुन आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी टीका केली आहे.
सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरून दोघेही एकमेकांना धारेवर धरत आहेत. नाना पटोले यांच्या नावाची ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून जोरदार चर्चा रंगू लागली. मात्र यावर खासदार पटेल यांनी भावी हे भावीच राहणार असे वक्तव्य करीत नानांनी दिवास्वप्न पाहू नये असा सूचक इशारा दिला. प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता “भावी हे भावीच राहतील” असा टोला केला. खासदार पटेल यांच्या या वक्तव्यावर आमदार नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘मी मुख्यमंत्री होणारच’ असे पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना ठणकावून सांगितले आहे.
हे देखील वाचा : दसरा मेळावा गाजणार ! यंदा पहिल्यांदा धनंजय अन् पंकजा मुंडे येणार एकत्र
लोकसभा निवडणूकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आणि निवडणुकीच्या निकालामध्ये बाजी मारलेला कॉंग्रेस पक्षाच्या देखील महत्त्वकांशा वाढल्या आहेत. कॉंग्रेस हाच मोठा भाऊ आहे, त्यामुळे कॉंग्रेसकडून सुद्धा मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावर रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी निवडणूकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. तर निवडणूकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री नाना पटोले होणार की उद्धव ठाकरे यांची चर्चा रंगली आहे.