प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
सोलापूर : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत (एन कॅप) 40 कोटी निधीतून यादीत सत्ताधारी भाजपच्या आमदारांच्या रस्ते कामे घेण्यात आली. त्यामध्ये खासदाराचे एक ही काम घेतले नाही असा आरोप करत खासदार म्हणून मी दिलेल्या पत्रातील कामांचा समावेश केला नाही. खासदारांना डावलून टेंडर प्रक्रिया राबवलीच कशी ? तर मग हक्कभंग आणू का ? वीस वर्षात असे मी कधी केले नाही. खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. एवढा भ्रष्टाचार आतापर्यंत कधी झालाच नाही. एकतर्फी कारभार सुरू आहे असा आरोप करत केलेल्या सर्व यादीची टेंडर प्रक्रिया तत्काळ थांबवा आणि सर्वांना समान निधी द्या अशी मागणी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील बैठकीत केली.
महापालिकेत खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या समवेत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम योजना आणि काल झालेल्या अतिवृष्टी मध्ये शहरवासी यांचे झालेले नुकसान या विषयासंदर्भात बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रणिती शिंदेची आक्रमक भूमिका
या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. विविध प्रश्न उपस्थित करत आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि नगर अभियंता यांना खडे बोल सुनावत अधिकाऱ्यांनादेखील धारेवर धरले. त्यांच्या विविध प्रश्नांवर वरिष्ठ अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष नरोटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
Solapur News: सोलापूर बाजार समितीपदी काँग्रेसचे दिलीप माने यांची निवड
नक्की काय आहे योजना?
एन कॅप ही केंद्र शासनाची योजना आहे. 40 कोटीचा निधी सोलापूर महापालिकेसाठी मंजूर झाला आहे मात्र या योजनेतील विविध कामांची यादी करीत असताना भाजपच्या आमदारांच्या कामांचा केवळ समावेश करण्यात आला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी वेळेत कामाची यादीचे पत्र महापालिकेला सादर करूनही त्यापैकी एकाही कामाचा समावेश या योजनेत केला नाही. सरळ सरळ डावलण्यात आले आहे असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
तातडीने ही यादी रद्द करून निविदा प्रक्रिया थांबवा. आमची ही कामे समाविष्ट करा. चुकीच्या पद्धतीने सिस्टीम राबवण्यात आली आहे. एकतर्फी कारभार करण्यात येत आहे. पूर्णपणे सर्व सिस्टीम ढासळली आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने ही व्यवस्था कोलमडली आहे. खासदारांच्या कामांना डावलले जातेच कसे ? यावरून प्रणिती शिंदे या चांगल्याच भडकल्या.
EVM मशिनवर निवडून आलो नाही
एवढा भ्रष्टाचार यापूर्वी कधी झालाच नाही. सर्व यादी रद्द करून खासदारांच्या कामाचा समावेश करावा. या योजनेची यादी करीत असताना महापालिका आयुक्तांनी खासदारांना का विचारले नाही? चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे. अशी प्रक्रिया होतेच कशी?तीन आमदारात निधी वाटून घेतला. निधी केंद्र शासनाचा असताना खासदारांना डावलणे चुकीचे आहे. नवी प्रथा महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. खालच्या थराचे राजकारण केले जात आहे. आत्ताच “दूध का दूध आणि पाणी का पाणी का करा” जे चालले आहे ते चुकीचे चालले आहे, अशा खरमरीत शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला.
यापूर्वी मी विविध समित्यांमध्ये कार्यरत होते एखाद्या समितीची मीटिंग मी महापालिकेत आणली असती तर महापालिकेतील अधिकारी निलंबित झाले असते मात्र तसे मी केले नाही. पूर्ण व्यवस्था ढासळली आहे.गेल्या अनेक निवडणुकात आम्ही लोकांवर निवडून आलो आहोत. ईव्हीएम मशीन वर नाही. खासदारांचे कामे कशी काय डावलेली जातात असा प्रश्न आयुक्तांना विचारला. मी नाही का हक्कभंग आणू शकत आणू शकते. तर मग हक्क भंग आणू का असे ठणकावून सांगत तातडीने अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रिया थांबून खासदारांच्या कामाचा समावेश करावा अन्यथा आयुक्त कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिला.
येत्या मंगळवार पर्यंत लेखी उत्तर देणार: आयुक्त
दरम्यान या बैठकीत प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी काय कार्यवाही करणार असा प्रश्न आयुक्त डॉक्टर सचिन ओम्बासे यांना उपस्थित केला. त्यावर येत्या मंगळवार पर्यंत एनकॅप योजनेअंतर्गत खासदारांच्या पत्रास उत्तर देणार आहे. खासदारांच्या पत्रानुसार कामांचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
‘प्रणिती शिंदे भाजपची ‘बी टीम’, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी’; ठाकरे गटाचा हल्लाबोल
कारवाईची मागणी करणार
सोलापूर शहरात अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महापालिका प्रशासनाने योग्य वेळी योग्य पद्धतीने कामे न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्या संबंधित नगर अभियंता आणि आरोग्य अभियंता विभाग जबाबदार आहे. यामुळे या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.