President Draupadi Murmu's speech in vidhan parishad
मुंबई : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये उपस्थिती लावली. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मागील सहा वर्षातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण असे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विधान परिषदेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मराठी कवितेच्या पंक्ती म्हणून भाषणाला सुरुवात केली. तसेच महिला शक्ती आणि संधीबाबत भाषणामध्ये संबोधित केले.
काय म्हणाल्या राष्ट्रपती मुर्मू?
महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘बहुत असोत सुंदर, सम्पन्न की महा, प्रिय अमुचा एक, महाराष्ट्र देश हा’, या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या कवितेने सुरुवात केली. तसेच विधान परिषदेच्या कामकाज आणि इतिहासाचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून केला. भाषणामध्ये राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहीलेल्या महाराष्ट्रांने देशात अनेक कायदे, सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे. 103 वर्षे झालेल्या महाराष्ट्राच्या कायदेमंडळाने राज्यातील नागरिकांच्या आशा-आकांक्षांना अभिव्यक्त केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कायदेमंडळाचे सदस्य होते. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या कायदेमंडळाला होणे हे सौभाग्य आहे. आपल्या विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे यांनी ‘मनरेगा’ योजना आणली. महाराष्ट्राच्या समृद्ध विधानपरिषदेने लोकशाही परंपरांना समृद्ध केले आहे,” असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले आहे.
महिला सशक्तीकरणावर भर
मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणामध्ये महिला सशक्तीकरणावर प्रकाश टाकला. महिलांना संधी आणि सहाय्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ मॉसाहेब आणि सावित्रीबाई फुले यांचा आवर्जुन उल्लेख केला. राष्ट्रपती म्हणाल्या, “आपण सर्वांनी महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलणे, त्यात सुधारणा करणे याची जबाबदारी आहे. या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर महिलांविषयीचा योग्य दृष्टिकोन विकसित होईल. राजमाता जिजाबाईंची ही भूमी आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिला शिक्षणाचा पाया घातला गेला. महिलांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा थांबायलाच हव्यात. महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभा पाटील या मराठी महिलेकडे जातो. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, उपसभापती या महिला आहेत. महाराष्ट्राच्या मुली देश आणि राज्याचा गौरव वाढवतील,” असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधले.
विधान परिषदेच्या या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह आमदार उपस्थित होते.