Pro Kabaddi League 11 The Team That Plays Best will Win Coaches of Teams That have Made It to Knockout Stages Express Confidence
पुणे : बाद फेरीत चुकांना संधी नसते. सर्वोत्तम खेळ करणारा संघच येथे जिंकणार. मोठ्या लढतींचा दबाब कुठला संघ व्यवस्थित हाताळतो, यावरही बरेच काही अवलंबून असते, असे मत प्रो-कबड्डी लीगच्या बाद फेरीत दाखल झालेल्या संघाच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केले. हरियाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली या संघांनी यंदाच्या मोसमात गुणतक्त्यात अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आता यूपी योद्धाज वि. जयपूर पिंक पँथर्स यांच्यात एलिमिनेटर -१, तर पाटणा पायरेट्स वि. यू मुम्बा यांच्यात एलिमिनेट-२ लढत रंगणार आहे. या लढती म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहेत.
हे प्रशिक्षक दिसले एकत्र
या पार्श्वभूमीवर हरियाणाचे प्रशिक्षक मनप्रीत सिंग, दिल्ली संघाचे प्रशिक्षक जोगिंदर नरवाल, यूपी संघाचे प्रशिक्षक जसवीरसिंग, पाटणा संघाचे प्रशिक्षक नरेंदर रेधू, यू मुम्बा संघाचे प्रशिक्षक घोलमरेझा माझांदरनी, जयपूर संघाचे प्रशिक्षक संजीव बलियान पत्रकार परिषदेत एकत्र आले होते.
आमचा आत्मविश्वास वाढलेला
हरियाणा संघाचे प्रशिक्षक मनप्रीतसिंग म्हणाले, येथे प्रत्येक संघ जिंकायलाच आला आहे. आता स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचा प्रतिस्पर्धी कोण याचा विचार न करता आमच्या जमेच्या बाजूंवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. थेट उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे.
दिल्लीचे प्रशिक्षक
दिल्लीचे प्रशिक्षक जोगिंदर म्हणाले, जो संघ चांगला खेळणार, तो जिंकणारच. आमची संघ बांधणी मजबूत असून, याचे श्रेय माझ्यापेक्षा खेळाडूंनाच आहे. हीच एकजूट आम्ही उपांत्य फेरीत दाखविणार आहोत. पाटणा संघाचे प्रशिक्षक नरेंद्र म्हणाले, या मोसमात आम्ही काही लढती अखेरच्या क्षणी जिंकल्या आहेत. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. शेवटच्या क्षणी कच न खाणे हे आमच्या संघाचे वैशिष्ट्ये आहे. नैसर्गिक खेळावर भर देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
यूपी संघाचे प्रशिक्षक जसवीर यांनी सांगितले की, गेल्या मोसमात आमची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यानंतर संघात काय बदल करता येईल, याचा विचार आम्ही केला. संघात थोडे बदल केले. झालेल्या चुकांचा आढावा घेतला.त्यामुळेच तुम्ही या वेळी एक चांगला संघ बघत आहात. चुका मान्य करण्यात गैर काहीच नाहीत. त्या पुन्हा-पुन्हा होऊ नयेत, यावरच प्रशिक्षक म्हणून लक्ष द्यावे लागते.
जयपूर संघाचे प्रशिक्षक संजीव म्हणाले, मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा आम्हाला अनुभव आहे. दबाव हाताळण्याचे हे कौशल्या आम्हाला उपयोगी पडणार आहे. एक चूक आम्हाला बाहेर काढू शकते, याची कल्पना खेळाडूंना आहे. यू मुम्बाचे प्रशिक्षक माझांदरनी म्हणाले, आम्ही प्रत्येक लढतीचा आनंद घेत आहोत. आमच्याकडे अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल आहे. सर्व खेळाडू तंदुरुस्त असून, एकमेकांच्या साथीनेच आम्ही आगेकूच करणार.
आज होणाऱ्या लढती
एलिमिनेटर 1 : तिसऱ्या क्रमांकावरील यूपी योद्धाज आणि सहाव्या क्रमांकावरील जयपूर पिंक पॅनथर्स यांच्यात ही लढत होणार आहे. जिंकणारा संघ उपांत्य फेरीत दाखल होईल, तर पराभूत संघ बाहेर जाईल.
एलिमिनेटर 2 : पाटणा पायरेटस आणि यू मुंबा आज आमनेसामने येत आहेत. पाटणा चौथ्या, तर मुंबा संघ पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.दोन्ही संघांनी यंदाच्या मोसमात तोडीस तोड खेळ केला आहे. आता कोण कोणाला रोखणार, कोणाचे डावपेच यशस्वी होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रशिक्षक म्हणालेत….
– कबड्डीत अष्टपैलूंची भूमिका महत्त्वाची. असे खेळाडू संघात असले, तर विजयाची खात्री असते.
– आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. संघाच्या जमेच्या आणि कमकुवत बाजूंची आम्हाला कल्पना आहे.
– शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडूंची तंदुरुस्ती महत्त्वाची ठरणार आहे.
– प्रशिक्षक म्हणून आम्ही खेळाडूंना रागावत नाहीत. त्यांना कसे खेळायचे हे सांगायची गरज नाही. काय चुकतय हे दाखवून द्यावे लागते.
– चुकांसाठी एकाच खेळाडूला दोषी ठरवून चालत नाही. प्रशिक्षक म्हणून खेळाडूंवर विश्वास दाखवावा लागतो.
अशा रंगतील लढती
२६ डिसेंबर – एलिमिनेटर – १
यूपी योद्धाज वि. जयपूर पिंक पँथर्स
रात्री – ८ पासून
एलिमिनेटर – २
पाटणा पायरेट्स वि. यू मुम्बा
रात्री – ९ पासून
२७ डिसेंबर – उपांत्य लढत
हरियाणा स्टीलर्स वि. ….
रात्री ८ पासून
दबंग दिल्ली वि. ….
रात्री ९ पासून
२९ डिसेंबर – अंतिम लढत