पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात घडलेल्या त्या उच्चभ्रू अपघाताचे आता मुंबई कनेक्शन समोर आले असून, ती आलिशान पोर्शो कार मुंबई व्हाया पुणे अशी शहरात दाखल झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या कारची आरटीओ कार्यालयात नोंदणीच झालेली नसून, नोंदणी न होताच ती गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवर चालवली जात होती. तिचा ४० लाखांचा टॅक्स न भरल्याने तिची नोंदणी झालेली नाही, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अपघातात मृत झालेल्या त्या युवक व युतीच्या कुटुंबीयांना विम्याच्या रकमेचा लाभ मिळणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. एकूणच या अपघातामुळे सर्वच सरकारी यंत्रणांचा भोंगळ कारभार समोर येऊ लागला आहे.
आरटीओ नोंद न करता वाहनाचा दिला ताबा
नियमानुसार, नवीन वाहन खरेदी केल्यानंतर ते वाहन आरटीओ (परिवहन कार्यालय) नोंद करून संबंधित व्यक्तींच्या नावावर केली जाते. त्याला एक क्रमांक दिला जातो आणि मग ते वाहन संबंधित व्यक्तीला दिले जाते. दरम्यान ही संपूर्ण जबाबदारी ज्या ठिकाणावरून वाहन खरेदी केले त्या शोरुम चालकाची असते. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तो पर्यंत वाहन सोपवले जात नाही. तसेच, ते वाहन रस्त्यांवर चालविण्यास देखील नियमानुसार बंदी असते.
ही अलिशान कार परराज्यातून महाराष्ट्रात दाखल
मात्र, कल्याणीनगरमधील अपघातातील त्या पोर्शो कारवर दोन्ही बाजूने नंबर प्लेट नसल्याने यासंदंर्भात माहिती घेतली असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ही अलिशान कार परराज्यातून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ती कार मुंबईतील एका शोरूममधून संबंधित बिल्डराने घेतली. त्यानंतर ती नावावर करण्यासाठी २० मार्च २०२४ म्हणजे, बरोबर दोन महिन्यांपुर्वी आरटीओ कार्यालयात अर्ज दाखल केला होता. आरटीओ कार्यालयाने त्याचे पाहणी (इन्स्पेक्शन) केली. त्यानुसार या कारच्या किंमतीनुसार साधारण ४० लाख रुपयांचा कर (टॅक्स) भरणा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, तो कर भरण्यात आला नाही. त्यामुळे त्याची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली नाही. तसेच, संबंधित गाडीबाबत नंतर आरटीओ कार्यालयाकडे आलेही नाही.
४० लाखांचा टॅक्सही भरला नसल्याची माहिती
विशेष म्हणजे, ही कार मुंबईतील शोरूममधून पुण्यात आणली गेली. त्या कारची नोंदणी केल्यानंतर ती संबंधिताला देणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही आणि गेल्या दोन महिन्यांपासून ही कार पुण्यातील रस्त्यांवर विनानंबरप्लेट धावत राहिली. वाहतूक पोलिसांच्या देखील ती नजरेत पडली नाही. त्याचवेळी ती आपल्या अल्पवयीन मुलाला मद्यपार्टीसाठी देण्यात आली. या मुलासोबत गाडीचा चालक देखील होता. परंतु, मद्य ढोसल्यानंतर त्या मुलाने स्वत: या गाडीचे स्टेअरिंग हातात घेतले आणि वाहनांच्या वेगाची मर्यादा ओलांडत ती चालवली व दोन जीव घेतले. त्यानंतर आता या कारबाबत पूर्ण माहिती बाहेर आली आहे.
आरटीओ कार्यालय जबाबदार
एकूणच या अपघाताला वाहन नोंदणी न होता संबंधिताला वाहन देणारे, वाहन नोंदणी न करता वापरणारे की या महागड्या वाहनांची कागदपत्रे दाखल होऊनही त्याबाबत पुन्हा पाठपुरावा न करणारे आरटीओ कार्यालय जबाबदार म्हणता येईल. पुण्यातील या एका अपघाताने यंत्रणांचा भोंगळ कारभार मात्र समोर आणला आहे, असे म्हणता येईल.