पुणे : पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतुक सुविधेमध्ये मेट्रोदेखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुणेकरांच्या वाहतूकीसाठी मेट्रोचा प्रवास सुखकर ठरत आहेत. अनेकजण रोजच्या वाहतुकीसाठी मेट्रोचा वापर करत आहेत. आता पुणे मेट्रोकडून खास ऑफर देण्यात आली आहे. यामुळे सुखकर प्रवासासोबतच मेट्रो प्रवास स्वस्त देखील होणार आहे. पीएमपीएमएल बसप्रमाणे आता मेट्रोचा देखील दिवसभराचा पास दिला जाणार आहे. याची घोषणा पुणे मेट्रोकडून करण्यात आली आहे.
पुणे मेट्रोला मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर प्रशासन ही सार्वजनिक सुविधा अधिक चांगली बनवण्याचा प्रयत्नामध्ये आहे. मेट्रोचे मार्ग देखील वाढवण्यात येत असून मेट्रोला पुरक अशा सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेट्रो प्रशासनाकडून अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये आता बसप्रमाणे मेट्रोला देखील दैनंदिन पास दिला जाणार आहे. यामुळे अवघ्या 100 रुपयांमध्ये मेट्रोचा दिवसभराचा प्रवास करता येणार आहे.
मेट्रो प्रशासनाने या पासची किंमत प्रति व्यक्ती 100 रुपये निश्चित केली आहे. एकदा हा पास घेतला की तो परत करता येत नाही. तसेच, सर्व लोकांसाठी या पासची किंमत 100 रुपयेच आहे. हा पास खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीला मेट्रोने अमर्याद प्रवास करता येऊ शकतो. मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने दिवसभरासाठी एकच शंभर रुपयाचा पास काढला तर तो दोन्ही मार्गावर अमर्यादित प्रवासाची सुविधा त्यांना मिळणार आहे.