Chhatrapati shivaji maharaj statue collapse
पुणे : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. केवळ 8 महिन्यांपूर्वी अनावरण करण्यात आलेला हा पुतळा कोसळल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आल्याचे सत्ताधारी पक्षांकडून सांगण्यात आले. या प्रकरणावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकच गदारोळ सुरु आहे. विरोधकांनी महायुतीच्या नेत्यांना घेरले आहे. मात्र सत्तेमध्ये सामील असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील राजकोट किल्ल्यावरील या दुर्घटनेवरुन आंदोलन छेडले आहे. पुण्यामध्ये अजित पवार गटाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुक आंदोलन केले.
पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत दुर्दैवी घटना झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्याचे राष्ट्रवादी नेते रस्त्यावर उतरुन मुक आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी पक्षाने एस. एस. पी. एम. एस. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मुक आंदोलन केले. यावेळी करुन यापुढे अशाप्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून सर्वच पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि पालिका आयुक्त डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडे राष्ट्रवादीने केली.
हा खूप वेदनादायक प्रकार
त्याचप्रमाणे राजकोट किल्यावरील पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच भविष्यामध्ये अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेण्याची मागणी यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष दिपक मानकर म्हणाले की, ‘राजकोटमध्ये झालेला प्रकार हा खूप वेदनादायक व चीड आणणारा आहे. दोशींवर कडक कार्यवाही करून त्यांना कठोर शासन झाले पाहिजे व सदर जागी सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून परत पुतळा बसवण्यात यावा,’ अशी मागणी शहराध्यक्षांनी केली.
शेकडो सरकारे कुर्बान
सरकारमध्ये सहभागी असतानाही हे आंदोलन का करत आहात असे पत्रकारांनी विचारले असता कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाले, ‘छत्रपतींच्या अस्मितेकरीता सत्ता नसतानासुद्धा लढत होतो व सरकार असतानासुघ्दा यापुढेही लढत राहणार सरकारे येतील जातील छत्रपतींसाठी शेकडो सरकारे कुर्बान, परंतु युगपुरुष छत्रपती शिवाजी महारांचा अनादर कधीच सहन केला जाणार नाही,’ असे मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.
अजित पवारांची भरसभेत माफी
जनसन्मान यात्रेवेळी भाषणामध्ये अजित पवार यांनी मालवणमधील प्रकरणाचा निषेध केला. ते म्हणाले, “दोन तीन दिवसांपूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. वाऱ्यामध्ये हा पुतळा पडला. या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील. हे कोणी केलं अन् कधी याचा सगळा तपास केला पाहिजे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय की या प्रकरणामध्ये मी राज्याच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. आणि दैवताचा पुतळा या पद्धतीने वर्षाच्या आत पडला, हे सर्वांना धक्का देणारी बाब आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यापासून शेवटच्या माणसापर्यंत जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणातील कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.