शिवाजीनगर न्यायालयात आज (२३ नोव्हेंबर) बॉम्ब ठेवल्याची चर्चा
पोलिसांच्या सूचनेनुसार वकील, कर्मचारी व नागरिकांना बाहेर काढत परिसर रिकामा
गेल्या आठवड्यातही बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायालय परिसर रिकामा
Pune Court Bomb Threat: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची चर्चा सुरू झाल्याने आज (२३ नोव्हेंबर) एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बॉम्बची ठेवल्याची चर्चा सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून, परिसराची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, न्यायालयात बॉम्ब असल्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयात नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज सुरू असताना न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. ही माहिती काही वेळातच संपूर्ण परिसरात पसरली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय परिसर खाली करण्याच्या सूचना दिल्या.
या सूचनेनंतर न्यायालयातील वकील, कर्मचारी आणि इतर नागरिक परिसरातून बाहेर पडले. गेल्या आठवड्यातही बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाल्याने सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढली आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी न्यायालय परिसराची तपासणी केली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत न्यायालयात बॉम्ब आढळल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विविध न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. या धमकीनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. संबंधित न्यायालयांमध्ये तपासणी करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान धमकीमध्ये तथ्य आढळले नसल्याची माहिती समोर आली होती.
या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. आता पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात बॉम्ब असल्याची चर्चा सुरू झाल्याने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसर आज का रिकामा करण्यात आला?
आज (२३ नोव्हेंबर) दैनंदिन कामकाज सुरू असताना शिवाजीनगर न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी न्यायालय परिसर तातडीने रिकामा केला.
न्यायालयात बॉम्ब आढळल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे का?
नाही, पुणे पोलीस आणि तपास यंत्रणांकडून संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू असली तरी न्यायालयात बॉम्ब आढळल्याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
यापूर्वीही शिवाजीनगर न्यायालयाला अशी धमकी मिळाली होती का?
होय, गेल्या आठवड्यातही शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता आणि त्यावेळीही खबरदारी म्हणून न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला होता.