खरीप हंगामानंतरच देणार का बोनस?; शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
रांजणी : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने आंबेगाव तालुक्यात शेतीकामांसाठीची लगबग वाढली आहे. तालुक्यात खरीप पेरणी तसेच मशागतींची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. आंबेगाव तालुक्यात सुमारे 65 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याने शेतशिवार गजबजल्याचे चित्र पाहायला मिळते. वरूणराजाच्या कृपेमुळे उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यातील बहुतांश भागात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. पूर्वमशागतीच्या कामांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा पेरणीच्या कामात व्यग्र झाल्याचे पाहायला मिळते. आत्तापर्यंत तालुक्यात 65 टक्क्यांहून अधिक पेरणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये कडधान्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
तालुक्यात गतवर्षीपेक्षा यंदा चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेत-शिवारे पाण्याने तुडुंब भरली आहेत. यावर्षी ऊस लागवड क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. आतापर्यंत तालुक्यात कडधान्य आणि तृणधान्य पिकांच्या सुमारे 15 हजार 465 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच तब्बल 65 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी दिली.
बाजरी, मका, तूर या तृणधान्य पिकांची पेरणी पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, झालेल्या पेरण्या समाधानकारक आहेत. कडधान्यांमध्ये तूर, उडीद, मटकी, वाटाणा, हुलगा, चवळी, वाल, घेवडा या पिकांची सरासरी 11 हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 4 हजार 500 हेक्टरवर पूर्ण झाली आहे. तसेच पारंपारिक पीक पद्धतीला काहीसा फाटा देखील देण्यात आला आहे.
दरम्यान, तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भाताची लागवड जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी भात पिकाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, गतवर्षीपेक्षा यंदा आदिवासी पश्चिम भागात चांगला पाऊस पडल्याचे चित्र पाहायला मिळते. तसेच पूर्व भागात शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे आपला मोर्चा वळवला असून, यंदा सोयाबीन पिकाचे उत्पन्न देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मे आणि जून महिन्यात पाऊस चांगला
चालू वर्षी मे आणि जून महिन्यात पाऊस चांगला झाल्याने लवकरच कडधान्य आणि बाजरीची पेरणी केली. तसेच हवामान देखील पोषक असल्याने चांगले उत्पादन येऊन शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार भाव देखील चांगला मिळण्याचा अंदाज जाधववाडी ( ता. आंबेगाव ) येथील शेतकरी महेश कुंडलिक जाधव यांनी व्यक्त केला.