
पुण्याच्या स्वच्छतेसाठी प्रशासन 'अॅक्टिव्ह मोड'वर; सफाईत हलगर्जीपणा केल्यास दहापट दंड
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना सध्याच्या तुलनेत दहापट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बायोमेट्रिक हजेरी आणि जिओ-टंग छायाचित्रांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि सफाईच्या कामांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली. शहरातील सफाई व्यवस्थेत ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करणे आणि कामाच्या गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, हा नव्या निविदा अटींमागील मुख्य उद्देश आहे.
आतापर्यंत सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती, प्रत्यक्ष उपलब्ध मनुष्यबळ आणि कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठेकेदारांकडून कागदोपत्री कर्मचाऱ्यांची संख्या आणि हजेरी दाखवली जात असली, तरी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आवश्यक कर्मचारी उपस्थित नसल्याचे प्रकार घडतात. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे.
जबाबदाऱ्या पूर्ण न करणे ठेकेदारांना महागात पडणार
सफाईच्या कामात हलगर्जीपणा करणे किंवा निविदेतील निर्धारित जबाबदाऱ्या पूर्ण न करणे ठेकेदारांना महागात पडणार आहे. सध्या आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत दहापट वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. एखाद्या चुकीसाठी यापूर्वी एक हजार रुपयांचा दंड आकारला जात असल्यास, आता ही रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. ठेकेदारांनी निर्धारित वेळेत आणि अपेक्षित गुणवत्तेनुसार काम पूर्ण करावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
बिलांसाठी ८५ टक्के हजेरी अनिवार्य
नव्या निविदेतील अटीनुसार ठेकेदारांच्या बिलांच्या भुगतानासाठी किमान ८५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्याबाबत विचार सुरू आहे. निर्धारित उपस्थिती पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांच्या बिलांच्या भुगतानात अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद उपलब्ध होईल आणि बनावट हजेरी दाखवण्याचे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे.
जिओ-टॅग छायाचित्रांमुळे कामाची प्रत्यक्ष स्थिती समजणार
सफाईच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांना (सुपरवायझर) मोबाइल अॅप उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या अॅपद्वारे सफाईच्या ठिकाणीच छायाचित्र काढून ते अपलोड करणे बंधनकारक असेल. या छायाचित्रासोबत जिओ-टॅग नोंदविला जाणार असल्याने संबंधित कर्मचारी किंवा यंत्रसामग्री नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, याची माहिती मिळू शकेल. विशेष म्हणजे, मोबाइल गॅलरीमध्ये आधीपासून उपलब्ध असलेली जुनी छायाचित्रे अपलोड करता येणार नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष काम न करताच जुनी छायाचित्रे किंवा कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचे दाखविण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
FAQ
1. पुणे महापालिकेने स्वच्छतेसाठी कोणता निर्णय घेतला?
शहरातील सफाईच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना दहापट दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
2. ठेकेदारांना किती दंड आकारला जाणार?
सध्याच्या तुलनेत दहापट दंड आकारला जाणार आहे.
3. ठेकेदारांवर कोणत्या कारणांसाठी कारवाई होणार?
सफाईच्या कामात दिरंगाई करणे, निर्धारित वेळेत काम पूर्ण न करणे आणि काम न करताच पूर्ण झाल्याचे दाखवणे यांसाठी कारवाई होणार आहे.