
भारतीय मजदूर संघ पदाधिकाऱ्यांनी घेतली क्षेत्रीय भविष्य निर्वाह आयुक्तांची भेट
पुणे : भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पुणे येथील क्षेत्रीय भविष्य निर्वाह आयुक्त (Regional Provident Fund Commissioner) पूजा सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या भेटीदरम्यान संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्यातील विविध उद्योग, आस्थापना व कंत्राटी कामगारांशी संबंधित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) विषयक अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मांडले. विशेषतः कंत्राटी कामगारांच्या पीएफ कपातीची नियमित अंमलबजावणी, थकीत पीएफ रकमेची वसुली, पीएफ खाते अद्ययावत ठेवणे, यूएएन (UAN) संबंधित अडचणी, निवृत्त व सेवामुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित दाव्यांचा तातडीने निपटारा तसेच कामगारांना वेळेत न्याय मिळावा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पूजा सिंह यांनी भारतीय मजदूर संघाने कामगारांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या विधायक कार्याची दखल घेत, कर्मचारी हिताच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर चौकटीत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच EPFO व कामगार संघटनांमध्ये समन्वय वाढवून कामगारांना अधिक सुलभ व परिणामकारक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी कामगारांच्या सामाजिक सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पीएफ कायद्याचे काटेकोर पालन आणि प्रलंबित प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी EPFO प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती केली. पूजा सिंह यांनी नमूद केले नवीन सामाजिक सुरक्षा कोड व कामगारांचे भविष्य यासाठी पुढील कालावधीत जमा असलेली 25% रक्कम सेवानिवृत्तनंतर मिळेल, असे नमूद केले. तसेच दंडात्मक कारवाईबाबत विशेष सवलत देण्यात आली आहे. तसेच स्वेच्छापूर्वक पीएफचे सभासदत्वबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
समन्वय अधिक दृढ होईल
सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे कामगारांच्या विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी भारतीय मजदूर संघ व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या प्रसंगी भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात, पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, सेक्रटरी सागर पवार, व पुणे संघटन सचिव उमेश विश्वाद उपस्थित होते. भेटीदरम्यान कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि संघटना-प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद राखण्याच्या दृष्टीने पुढील काळातही अशा बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.