फोटो सौजन्य- सोशल मीडिया
ZP School Khadyachapada: कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या खाड्याच्या पाडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन ॲनिमेटेड व्हिडीओ बनवले. विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेत बनवलेल्या ॲनिमेटेड व्हिडिओचे कौतुक आता सर्वत्र होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आता रायगड जिल्हा परिषद शाळा, खाड्याचापाडा शाळेने करून दिली आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक संतोष नाटिकर यांचे मार्गदर्शन घेऊन कार्यशाळेत “आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे ॲनिमेटेड व्हिडिओ निर्मिती” केली आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेत इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे मार्गदर्शन शाळेचे शिक्षक संतोष देवेंद्र नाटीकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना एआय चा वापर करून केवळ काही मिनिटांत आकर्षक शैक्षणिक ॲनिमेटेड व्हिडिओ कसे तयार करता येतात, याचे प्रात्यक्षिकासह शिकवले.
या विद्यार्थ्यांनी स्वतः एआयच्या साहाय्याने विविध विषयांवरील ॲनिमेटेड व्हिडिओ तयार केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शिकण्याची उत्सुकता विशेष लक्षवेधी ठरली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थीही आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आत्मविश्वासाने वापर करत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
या कार्यशाळेत तयार झालेले विद्यार्थ्यांचे व्हिडिओ तसेच संपूर्ण कार्यशाळेचा विशेष व्हिडिओ “Learn with Santosh Natikar” या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.या माध्यमातून इतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना देखील एआय आधारित शिक्षणाची प्रेरणा मिळत आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी आणि भविष्याभिमुख ठरला आहे. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने रायगड जिल्हा परिषद शाळा, खाड्याचापाडा आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याची भावना पालक वर्गातून व्यक्त होत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचा हा अभिनव प्रयत्न शिक्षण क्षेत्रात निश्चितच आदर्श ठरत आहे. आता विद्यार्थ्यांना कौशल्यधिष्ठित शिक्षण देणारी शाळा म्हणून खाड्याचापाडा शाळेचा लौकिक आहे.






