
चारही उमेदवार निश्चितपणे जिंकतील- मुरलीधर मोहोळ
प्रत्येक उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार
ही रॅली प्रचाराची नव्हे तर विजयाची – मुरलीधर मोहोळ
पुणे: दुचाकी रॅलीला नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि विश्वासाने प्रतिसाद दिला. प्रभागातील चारही उमेदवार निश्चितपणे जिंकतील, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. ही रॅली प्रचाराची नव्हे तर विजयाची आहे, असेही ते म्हणाले.
प्रत्येक उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेल.
भाजपचा कार्यकर्ता विचाराने चालतो, संस्कृतीने काम करतो आणि निष्ठेने सेवा करतो. भाजपमध्ये व्यक्ती नव्हे तर पक्ष आणि विचारसरणीला सर्वोच्च स्थान. प्रभागातील चार उमेदवारांना मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा आहे.भाजपमधील प्रत्येक उमेदवार हा स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेचा विश्वास संपादन करणारा आहे. विविध सर्वेक्षणांनुसार पुण्याचा पुढील महापौर भाजपचाच असणार, हे जवळपास निश्चित. प्रभाग क्रमांक ०९ भाजपचा बालेकिल्ला असून येथील मतदार कमळ चिन्हालाच मतदान करणार. त्यामुळे १६ तारखेला हा प्रभाग ४–० ने भाजपच्या पारड्यात जाणार, असेही मोहोळ म्हणाले.
पुणे महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, प्रभाग क्रमांक ९ (ड) मध्ये भाजपाच्या प्रचाराला नवे बळ मिळाले आहे. भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांच्या प्रचारासाठी आज भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले.
Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
ही दुचाकी रॅली सकाळी १० वाजता सुस येथील भैरवनाथ मंदिरापासून सुरू होऊन दसरा चौक – पाण्याची टाकी, बालेवाडी येथे समाप्त झाली. रॅलीच्या माध्यमातून प्रभागातील विविध भागांतून जात भाजपाचा प्रचार अधिक व्यापक स्वरूपात पोहोचवला जाणार आहे.
दरम्यान, लहू बालवडकर यांनी आतापर्यंत केलेला डोअर-टू-डोअर प्रचार आणि विविध सोसायट्यांना दिलेल्या भेटींमुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या भेटींमध्ये तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका बालवडकर सातत्याने मांडत आहेत.
तरुणांचे रोजगार व क्रीडाविषयक प्रश्न, महिलांसाठी सुरक्षितता आणि सक्षमीकरण, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या नागरी अडचणी सोडवण्यावर त्यांचा भर आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये लहू बालवडकर हे सर्वाधिक पसंतीचे उमेदवार म्हणून मतदारांमध्ये चर्चेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लहू बालवडकर यांनी या दुचाकी रॅलीत स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.