पुणे : शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंचा चालक आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार मुख्य आरोपी अभिषेक सावरीकर यांच्यात टीईटी परीक्षेसंदर्भात झालेले मोबाईलमधील चॅटिंग पोलीसांच्या हाती लागले आहे. त्यात परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत बोलणे झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या सुपेंचा चालक व लातूरमधून अटक केलेला एजंट यांच्या पोलीस कोठडीत ६ जानेवारीपर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे.
सुनिल खंडू घोलप (वय ४८) आणि मनोज शिवाजी डोंगरे (वय ४५, रा. लातूर ) अशी पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पुणे पोलीसांच्या सायबर पोलीसांकडून शिक्षक पात्रता परिक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात नुकतीच आयुक्त तुकाराम सुपेचा चालक सुनिल घोलप व एजंट मनोज डोंगरे यांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांची ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीची मुदत वाढविली आहे.
दरम्यान, पोलीस तपासात चालक सुनिल आणि तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्यात झालेले मोबाईल चॉटिंग सापडले आहे. त्यात परिक्षेतील गैरव्यावहाराबाबत बोलणी झाली आसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्याबाबत अधिक तपाशील देता येणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. तर, एंजट मनोज डोंगरे याचा पैशांच्या देवाण-घेवाणीत सहभाग दिसून आला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलीसांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. त्यानुसार, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. त्यांना आणखी कोणी मदत केली आहे का, तसेच यात आणखी कोणी सहभागी आहे का याबाबत तपास केला जात आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.






